आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगनगरीततील दुभाजक होणार हिरवागार, केलाय युवकांनी निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अक्कलकोट रस्ता एमआयडीसी प्रवेशाचा मार्ग अतिशय मजबूत झाला. टपाल कार्यालयापासून पाण्याच्या टाक्यांपर्यंतच्या या रस्त्यावर दुभाजक आहे. त्यावर नुसतेच रानगवत उगवले होते. मंगळवारी पहाटेच काही युवक आले. गवत उपसण्यास सुरुवात केली. दोन-दोन फुटांवर खड्डे केले. त्यात कन्हेरीची रोपे रोवली. पाणी दिले आणि निघून गेले. एवढ्यावरच जबाबदारी संपलेली नाही. रोपांच्या जतनाची जबाबदारीही असल्याचे सांगून गेले.
त्यांचा निर्धारच सांगत होता, हे दुभाजक हिरवागार करण्याचा...
‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष, एक जीवन’ या अभियानात मंगळवारी अतुल्य सेवा प्रतिष्ठानच्या युवकांनी सहभाग नोंदवला. त्यांनी उद्याेगनगरीच्या या रस्त्यावर वृक्षारोपण करण्याचे ठरवलेच होते. ती संधी ‘दिव्य मराठी’ने दिली. प्रतिष्ठानकडे ११० रोपे सुपूर्द केल्यानंतर कार्यकर्त्यांनी भल्या पहाटेच या रस्त्यावर हजेरी लावली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास यन्नम, सचिव मयूर सग्गम, अनंत आडम, राम यन्नम, हर्षवर्धन आणि श्रीहरी वडलाकोंडा ही भावंडे यात अभियानात सहभागी झाली होती. खड्डे करण्यासाठी लागणारे साहित्य सोबत होतेच. पहिल्यांदा खड्डे मारले, माती उकरून काढली. त्याच्या भोवती उगवलेले रानगवत उपसून काढले. त्यानंतर त्यात कन्हेरीच्या कांड्या रोवल्या. माती टाकली.

कारमधून दिले पाणी : लावलेल्यारोपांना पाणी देण्यासाठी अतुल्य सेवा प्रतिष्ठानकडे कार आहे. त्याच्या मागील आसने काढून तिथे ३०० लिटर पाण्याची टाकी बसवली आहे. मागील दार उघडून टाकीला पाइप लावले, की पाणीपुरवठा सुरू. कारचालक पुढे चालवत असतो. मागून पाणी देण्याचे काम होते. पंधरा मिनिटांत पुरेसे पाणी दिले, की काम संपले. कार्यकर्त्यांना घरी सोडण्यासाठी वाहन तयार. सकाळी आठ वाजता ११० रोपे लावून झाली. आता रोज येऊन पाणी देण्याचे ठरले.

येथेही केले वृक्षारोपण : रविवारीबाळे परिसर, राजेश्वरी नगर, नागेश करजगी किड्स स्कूल आदी भागात वृक्षारोपण केेले. यास रोटरी क्लब ऑफ सोलापूर इलाईटचे सहकार्य लाभले. अध्यक्ष डॉ. गौरी कहाते पदाधिकारी अतुल सोहनी यांच्या सहकार्यामुळे १५० खड्डे जेसीबीच्या सहाय्याने मोफत करून दिले.
अक्कलकोट रस्त्यावरील आैद्योगिक वसाहतीच्या दुभाजकात मंगळवारी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले. अतुल्य सेवा प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी हे काम हाती घेतले. त्यावेळी श्रीनिवास यन्नम, मयूर सग्गम, अनंत अाडम आदी.

आर्ट ऑफ लिव्हिंगने गेल्या महिन्यात या रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केले होते. त्याच्या जतनाचीही जबाबदारी घेतली. मंगळवारी ही रोपे बऱ्यापैकी वाढलेली दिसून आली. पुरेशी वाढ झालेली ही रोपे नुकत्याच झालेल्या पावसाने डोलत होती. त्यांच्या बरोबरीने दुभाजकातील कन्हेरीची रोपे उगवली. त्याला छानपैकी फुले आली तर या रस्त्याचा चेहरामोहराच बदलून जाईल. हिरवाईने आच्छादित रस्त्यातून वाहने जातील. उद्योगनगरीतील प्रदूषण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...