आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाच्या साथीने गुन्हेगारांच्या मुलांमध्ये परिवर्तन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पारधी समाजातील गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठी धडपड करतानाच या मुलांना चांगले शिक्षण मिळावे या ध्यासाने झपाटलेले ज्ञानेश्वर भोसले यांचे कार्य आदर्श ठरावे असेच आहे. लहानपणापासून शिकण्याची जिद्द असलेल्या ज्ञानेश्वर यांना खोट्या गुन्ह्यांत गोवले गेले. १३ महिने कारागृहात राहून पारधी मुलांसाठी संघर्ष करणाऱ्या ज्ञानेश्वर यांची पुढे निर्दोष सुटका झाली. मग त्यांनी पूर्णपणे समाजकार्याला वाहून घेतले.

मंगळवेढा बार्शी तालुक्यातील पपुल्या-बिबुल्या या अट्टल चोरटे म्हणून कुख्यात असलेल्यांंना गुन्ह्यांतून मुक्ती मिळवून देत त्यांच्या जीवनात बदल घडवण्याचे कार्य ज्ञानेश्वर यांनीच केले. जेमतेम दहावीपर्यंत शिकलेल्या ज्ञानेश्वर यांची समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी धडपड सुरू आहे.

कारागृहातही सुधारणेचे काम : दुहेरीखुनाच्या गुन्ह्यात ज्ञानेश्वर १३ महिने कारागृहात होते. बाहेर येण्यासाठी पैसे नव्हते. सोडवणार कोण? बहिणीने दारोदार फिरून पैसे जमवले. समाजातील लोकांची मदत मिळाली नाही. अशा वेळी अपर्णा रामतीर्थकर, दादा इदाते, अरुण करमरकर, गिरीश प्रभुणे यांनी मदत केली. कारागृहात असताना ज्ञानेश्वर यांनी हक्कांसाठी आंदोलन केले. दाढी करण्यास साहित्य दिले जात नसे. स्वत: पुढाकार घेऊन कैद्यांची दाढी करविली. पारधी इतर कैद्यांनाही सुविधा मिळाव्यात म्हणून दिवस अन्नत्याग केला. सुरेश पवार कैद्याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या विरोधात ८५ जणांच्या मदतीने उपोषणही केले.

कैद्यांच्या मुलांसाठी उभारले वसतिगृहे :स्वत:साठी घर नको असल्याचे सांगून पारधी मुलांच्या शिक्षणासाठी मोहोळजवळ १० गुंठे जागा मिळवून ज्ञानेश्वर पाटील यांनी शाळा सुरू केली. या कामी सोलापूरचे जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांची मदत झाली. शासनमान्य नसल्याने शाळा बंद करून तेथे आता वसतिगृह आहे. १५-२० वर्षांची शिक्षा झालेले कैदी, १८ पेक्षा अधिक गुन्ह्यांत अडकलेले गुन्हेगार अशा लोकांची १२० मुले या ठिकाणी राहून शिकतात. ज्ञानेश्वर यांची पत्नी या मुलांचे संगोपन करते. सोलापूरमधील २८४ गावांत २००८ मध्ये पारधी समाजाचे कॅम्प लावून ४० हजार लोकांना मतदार कार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचे दाखले, ज्येष्ठ नागरिकाचे दाखले ज्ञानेश्वर यांनी मिळवून दिले आहेत.

बालपणापासून समाजकार्य
पारधींतील गुन्हेगारी संपवण्यासाठी ज्ञानेश्वर यांनी १५ व्या वर्षापासून कार्य सुरू केले. समाजबांधव मुख्य प्रवाहात यावे म्हणून मोहोळ येथे १९९७ मध्ये ‘भारतमाता आदिवासी पारधी समाज’ ‘भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान’ स्थापन केले. आदिवासी विकास योजने अंतर्गत पारधी समाजाला २२०० हेक्टर जमीन मिळावी यासाठीचा प्रस्ताव त्यांनी तयार केला. मंजुरीसाठी सध्या मंत्रालयात चकरा सुरू आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)