आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उत्पादन बंद’वर यंत्रमागधारक संघ आज घेणार निर्णय, मनसेप्रणीत संघटनेची राज ठाकरेंशी चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - येथील हिमालय टेक्स्टाइलवर कामगार भविष्य निर्वाह निधी कायद्यानुसार होणाऱ्या कारवाईला मुंबईच्या आैद्योगिक लवादाने स्थगिती दिली. हिमालयाच्या धर्तीवरच दोनशे कारखानदारांना अशाच पद्धतीने नोटिसा बजावल्या. त्यांच्यावरील कारवाईचे काय? असा प्रश्न यंत्रमागधारकांनी मंगळवारी केला. त्यावर विभागीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी वरिष्ठांचा अभिप्राय घेऊन बुधवारी स्पष्टीकरण देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ‘उत्पादन बंद’मागे घेण्याचा निर्णय एक दिवस पुढे गेला. 
 
डॉ. तिरपुडे यांनी कारखाने तपासणीची सुरुवात हिमालय टेक्स्टाइलपासून केली. पाहणीत एकाच छपराखाली सर्व उत्पादन विभाग एकमेकांवर अवलंबून असल्याची निरीक्षणे नोंदवत त्यांनी कामगार भविष्य निधीचा कायदा लागू केला. त्याच धर्तीवर इतर दोनशे कारखानदारांना नोटिसा बजावल्या. २००२ पासून पूर्वलक्षीप्रभावाने रकमा करण्याचे आदेश केले. त्याच्या विरोधात यंत्रमागधारकांनी गेल्या १२ दिवसांपासून उत्पादन बंद आंदोलन सुरू केले. मंगळवारीही हे अांदोलन सुरूच हाेते. 
 
अखेर पालकमंत्री बोलले 
दरम्यान,कारखानदारांनी पालकमंत्री तथा कामगार राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे दुपारी धाव घेतली. त्यांना निक्षून सांगताना देशमुख म्हणाले, ‘कारखाने सुरू करत असाल तरच माझ्याकडे या...’ गेले १२ दिवस ते या प्रकरणावर काहीच बोलत नव्हते. मंगळवारी कारखानदार स्वत: गेले म्हणून निदान बोलले तरी.. त्यांच्या विधानावर सायंकाळी सविस्तर बोलण्याचे ठरले होते. परंतु डॉ. तिरपुडे यांची भूमिका स्पष्ट नसल्याने तिथे काय बोलणार? कारखाने कसे चालू करणार? हा प्रश्न होता. त्यामुळे सायंकाळची बैठक काही झाली नाही. बुधवारीच बंदवर निर्णय होईल. 
 
कृती समितीची सभा त्यानंतर जेवण 
दिवाळीच्या सणात कामगारांची उपासमारी होऊ नये म्हणून यंत्रमागधारक संघाने सोमवारपासून जेवण देण्यास सुरवात केली. माधवनगर येथील बालाजी गार्डनमध्ये मंगळवारीही सुमारे पाच हजार कामगारांनी त्याचा लाभ घेतला. हीच मंडळी सकाळी झालेल्या कामगार संघटना कृती समितीच्या आंदोलनात सहभागी झाली होती. त्यानंतर संबंधित कारखान्यात जाऊन त्यांनी कूपन घेतले. जेवण घेतले. 
 
मनसेप्रणीत संघटनेची राज ठाकरेंशी चर्चा 
मनसेप्रणीत कामगार संघटनेने हे प्रकरण मंगळवारी राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर नेले. पक्षाचे येथील नेते दिलीप धोत्रे, श्रीधर गुडेली यांनी संघटनेने केलेल्या आंदोलनाची माहिती दिली. कारखानदार कायद्याचे उल्लंघन करतात. पण यंत्रणा त्यांच्यावर कुठलीच कारवाई करत नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर श्री. ठाकरे यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा आदेश दिला. गरज वाटली तर मी स्वत: सोलापूरला येईन, असेही म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...