आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Court Order To Set Up The Toilets In The Women's Safety

महिलांच्या सुरक्षेसाठी स्वच्छतागृहे उभारण्याचे हायकोर्टाचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महिलांना सन्मानाने जगण्याच्या दृष्टीने स्वच्छता सुरक्षित स्वच्छतागृहे उपलब्ध करण्याचे काम राज्य शासन महापालिकेचे आहे. राज्यातील महापालिकेने या विषयाकडे गंभीरतेने लक्ष द्यावेत. तसेच, येत्या मार्चपर्यंत योजना आखत महिलांकरिता स्वच्छतागृहे उभारण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने सर्व महापालिकेला दिले आहेत, तर दुसरीकडे सोलापूर महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी शहरात तीन ठिकाणी सुसज्ज अशी स्वच्छतागृहे उभारूनही त्याचा वापर होत नसल्याची स्थिती आहे.
महिलांच्या सोयीसुविधा पाहणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. शौचालयाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी "मिळून साऱ्याजणी' संस्था काही महिला कार्यकर्त्यांनी मिळून अॅड. कल्याणी तुळणकर अॅड. सुगंध देशमुख यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने महिला शौचालये उभारण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील सर्व महापालिकेला न्यायालयाने फटकारले असून स्वच्छतागृह प्रश्नावर मार्चपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

सोलापुरात नेमकी उलटी स्थिती आहे. तत्कालीन महापौर अलका राठोड यांच्या कार्यकाळात महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी दहा जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कंबर तलाव उद्यान, रुपाभवानी मंदिर परिसर आाणि बाळे येथे तीन सुसज्ज स्वच्छतागृहे उभारण्यात आली होती. मात्र, सहा महिने उलटली तरी त्याचा वापर नाही अशी स्थिती आहे. खंडोबा यात्रेमुळे बाळे येथील स्वच्छतागृहे तात्पुरते सुरू करण्यात आले आहेत. मात्र रुपाभवानी मंदिर आणि कंबर तलाव उद्यान येथील शौचालये सुरू करण्यास आरोग्य विभाग चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे.बाजारपेठेत महिलांसाठी स्वच्छतागृहे असणे गरजेचे, या विषयावर ‘दिव्य मराठी’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. महापौर सुशीला आबुटे यांनी आदेश देऊनही स्वच्छतागृहे सुरू झाली नाहीत.
विजापूर रस्त्यावरील धर्मवीर संभाजी तलाव (कंबर) येथे महिलांसाठी उभारण्यात आलेल्या सुलभ शौचालयाची इमारत उद््घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

विषयाची माहिती घेणार
^महापालिकेने उभारलेली महिला शौचालये सुरू करण्याबाबत नेमके काय कारण आहे पाहून उद्याच निर्णय घेतो. स्वच्छतागृहे बांधून तयार असलीतर त्यांचा लाभ नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. विजयकुमार काळम पाटील, आयुक्त,महापालिका

स्वच्छतागृहाचा गैरवापर, रचनाच बदलली
प्रत्येक ठिकाणी २५ बाय १० स्क्वेअर फूट एवढ्या जागेवर चार बाथरुम आणि चार शौचालये अशी विभागणी करून स्वच्छतागृहे उभारण्यात येत आहेत. वरच्या इमारतीवर हॉल असणार आहे. मात्र, कंबर तलाव आणि रूपाभवानी मंदिर परिसरात हॉलचा गैरवापर होतो, ही बाब पुढे आली. त्यामुळे इतर स्वच्छतागृहे उभारणीत वरच्या मजल्याचा हॉल रद्द करून तळमजल्यावर अकरा सीटचे स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. शिवाय शौचालय आणि स्नानगृहे बांधण्यात येणार आहेत. एका स्वच्छतागृहास सुमारे दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

दहा ठिकाणी होणार स्वच्छतागृहे
कंबरतलाव, रूपाभवानी मंदिर, बाळे यासह सुशीलनगर, यशवंत गायकवाड घरालगत, बहुरूपी नगर सार्वजनिक शौचालयाच्या जागेवर, एसटी स्टँडच्या आवारात, प्राणिसंग्रहालय, नेहरूनगर शाळेच्या मागे, सलगर वस्ती डोणगाव रोड, मुकुंद नगर, विद्यासागर वाचनालयालगत स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत.