आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात रोखण्याचे नाहीत उपाय, नुसत्याच बैठका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दीडवर्षापूर्वी सोलापुरातून जाणाऱ्या महामार्गांचे भूमिपूजन झाले. पण अद्यापही काही महामार्ग पूर्ण नाहीत. आणि काही महामार्गांचे काम सुरूच नाही, असे चित्र अाहे. ही कामे पूर्ण झाल्याने दीड वर्षात सुमारे सात जणांचा बळी गेला अाहे. तरीही केवळ बैठकाच होऊ लागल्या अाहेत. रविवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घेतलेल्या एका बैठकीची त्यात भर पडली. भूसंपादन होत नाही, काम करण्याची मुदत संपली, निधीची अडचण अाली अशीच कारणे समोर येऊ लागली अाहेत. लोकांचे बळी जाणे रोखण्यासाठी नियोजन होणार की, नुसत्याच बैठका? असा प्रश्न पडला अाहे. 
 
दीड वर्षापूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर-पुणे, हैदराबाद, सोलापूर-धुळे महामार्गांचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अाणखी काही महामार्गांचे भूमिपूजन झाले. त्यांनी रस्त्यांच्या मंजुरीची घोषणा केली. त्या कामाचा शुभारंभ २६ मार्च २०१६ रोजी जुळे सोलापूर येथे झाला. पण प्रत्यक्षात प्रशासकीय यंत्रणेत कामे रखडली. हैदराबाद-सोलापूर-विजापूर महामार्गावरील शहरातून जाणाऱ्या रस्त्यावरील अपघाताची मालिका सुरूच आहे. त्यातून दीड वर्षात सुमारे सात जणांचा बळी गेला अाहे. विशेषत: विद्यार्थी, विद्यार्थिनींना जीव मगवावा लागला अाहे. हे जीवघेणे अपघात थांबवण्यासाठी कामे मार्गी लावण्याचे सोडून केवळ बैठकाच बैठका होत अाहेत. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रविवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली. हैदराबद रोड येथील मार्केट यार्ड परिसरातील काम सुरू करण्याबाबत विचारणा केली. शहरातील भूसंपादनाचा प्रश्न पुढे करत महामार्ग अधिकाऱ्यांनी बचावात्मक भूमिका घेतली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम यांना बोलावून भूसंपादनाबाबत विचारणा केली. 

पालखी मार्गावर सोय करण्याचा प्रयत्न 
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर सोयी सुविधा करण्यासाठी जागा आहे का, याचा अाढावा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे १० जानेवारी रोजी घेणार आहेत. त्यानुसार मार्गाची पाहणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने रविवारी केली. 

उड्डाणपूल चर्चेची केवळ उड्डाणे 
शिवाजी चौक ते सात रस्तापर्यंत उड्डाणपूल करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. काही इमारतींना बाधा येणार आहे. त्यापोटी नागपूरप्रमाणे त्यांना टीडीआर देऊन भूसंपादन करावे असा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिला. पण नागरिक तयार होतील का? भूसंपादन करावयाचे झाल्यास हजार ३०० कोटींची गरज पडणार आहे. 

केंद्राची मंजुरी, पण कामे संथगतीने 
राष्ट्रीयमहामार्गावरील शिवाजी चौक ते सात रस्ता आणि मार्केट यार्ड ते विजापूर राेड हे दोन उड्डाणपूल मंजूर असून, त्याचे उद््घाटनही करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे वित्तीय प्रस्ताव गेले नाही. त्यामुळे निधी उपलब्ध झाले नाही. शहरात अपघाताची मालिका सुरूच आहे. अपघात आणि जडवाहतूक कमी करण्यासाठी उड्डाणपुलांची गरज आहे. त्यामुळे केंद्राने मंजुरी दिली पण प्रशासकीय कामात गती येत नसल्याने संथगतीने काम होताना दिसून येत आहे. 

निधी मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांची चर्चा 
राष्ट्रीय महामार्गाचे संचालक तावडे साेलापुरात आले असता, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शहरातील उड्डाणपुलाबाबत आढावा घेतला. भूसंपादनाबाबत माहिती घेतली. टीडीआर आणि शासनाकडून भूसंपादन याबाबत आढावा घेतला. कामे लवकर सुरू करावे यासाठी केंद्राकडून निधी मिळवणे आणि प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा केली.