आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायवेवर उभे ट्रक, अपघाताला मिळते थेट निमंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - महामार्गांवरील अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वाहनांचा भरधाव वेग हे या अपघातामागील एक कारण असले तरी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांमुळेही अनेक अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सोलापूर पुणे महामार्गावर शुक्रवारी सकाळी पाकणी येथे भीषण अपघात झाला. यात अक्कलकोट येथील आदोने परिवारातील चार जणांना जीव गमवावा लागला. भर हायवेवर किरकाेळ कारणासाठी थांबलेल्या टँकरवर या परिवाराची बोलेरो पाठीमागून धडकली. टायर पंक्चर झाल्याने हा टँकर रस्त्याच्या कडेला उभा होता. हायवे लेनवर गाडी उभी केल्याने अपघाताला निमंत्रणच मिळाले.
महामार्ग वाहतूक पोलिस केंद्र कोंडी येथे आहे. या पोलिस केंद्रातर्फे वारंवार मुव्हींग पेट्रोलिंग केले जाते. रस्त्याच्या कडेला कोणत्याही कारणाने गाड्या उभ्या असतील तर त्यांना बाजूला घेणे, दंडात्मक कारवाई करणे या पथकाचे रोजचे कामच बनले आहे.

अपघातानंतर हलली यंत्रणा : पाकणी येथे भीषण अपघात घडल्यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या यंत्रणेला जाग आली आणि रस्त्याचा दुभाजक खोदून दुचाकींची अवैध रहदारी अशी बंद केली. छाया.रामदास काटकर

वाहन उभे करणाऱ्यास २०० रुपये इतकाच दंड
महामार्ग वाहतूक केंद्राच्या अखत्यारीत सोलापूर ते पुणे जिल्हा सीमा हद्दीपर्यंतचा मोठा भाग येतो. जी वाहने नियमांचा भंग करून उभी राहतात त्यांच्यावर रोज पेट्रोलिंगमध्ये दंडात्मक कारवाई होते. हायवेवर वाहने उभी केली तर अपघातास कारणीभूत ठरेल अशा निष्काळजीपणे वाहन उभे करणे १२२ / ७७ या कलमाचा वापर करून २०० रुपये इतकाच दंड होतो. साहजिकच ट्रकचालक इतक्या किरकोळ कारवाईला घाबरत नाहीत.

गाडी उभी केल्यास दंड
^हायवेलेनवर कोणत्याही कारणाने गाड्यांना उभे राहता येत नाही. विनाकारण गाडी लेनवर उभी केल्यास १२२ / ७७ अन्वये दंडात्मक कारवाई होते. बी.एल. काशीद, महामार्ग वाहतूक पोलिस केंद्र, पाकणी

मंेढ्यांना असेच नेतो : विद्यापीठासमोरच्या डिव्हायडरमधून १०० ते १२५ मेंढरे हायवे क्रॉस करत होती. मेंढपाळाला विचारले असता चाऱ्यासाठी हायवे क्राॅस करत असल्याचे सांगितले. असे करणे मोठ्या अपघातास निमंत्रण आहे हे त्या मेंढपाळाच्या ध्यानीमनीही नव्हते.

ट्रकखालीच झोपला : सोलापूर विद्यापीठाजवळ एक ट्रकचालक स्लो लेनवर ट्रक उभा करून गाडीखाली झोपल्याचे आढळले. विचारणा केल्यानंतर ट्रक बंद पडला आहे, मालकाला सांगितले आहे. त्याचा निर्णय आल्यानंतर ट्रक काढतो, असे मख्ख उत्तर दिले.

प्रवाशांसाठी रस्त्यात थांबवला ट्रक : बाळ्याजवळील शिवाजीनगर येथे भर हायवेवर एक ट्रक उभा होता. ट्रकचालक प्रवाशांना ट्रकमध्ये घेत होता. दरम्यान लेनवरून इतर वाहने भरधाव वेगाने ओव्हरटेक करत पुढे जात होती. महामार्गावर ट्रक थांबवून प्रवाशी घेण्याने भीषण अपघाताला निमंत्रण मिळू शकते.
बातम्या आणखी आहेत...