आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू धर्म हा पंथ - सांप्रदाय नव्हे तर ही जीवनशैली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आज केवळ भारतातच नाही तर सगळ्या जगभर हिंदू, हिंदुत्व, हिंदूवाद, हिंदूविचार, हिंदूधर्म या सगळ्या संकल्पनांच्या अनुषंगाने अनुकूल आणि प्रतिकूल अशी चर्चा होते. हिंदूधर्म, हिंदुत्व यांच्या यांच्या बाजूने बोलणारे अाणि विरोधात बोलणारे यापैकी किती जणांनी मुळातून हिंदू धर्म ही संकल्पना समजावून घेतली असेल, याबाबत माझ्या मनात शंका आहे. हिंदू धर्म ही केवळ उपासना, एखादा संप्रदाय किंवा एखादा धार्मिक पंथ ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीचा संप्रदाय किंवा पंथ नाही. हिंदू धर्म ही एक जीवनशैली आहे, असे जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ तरी नेमका काय होतो? आज आपल्या दृष्टीने एक खूप चांगली गोष्ट घडते आहे, की हिंदू धर्म मूलत: जो वेद आणि उपनिषदांपासून सुरू झालेला आहे. त्याच धर्माच्या सर्व अंगांची (त्यातील कर्मकांड, तत्त्वज्ञान सर्व आलं) अशा सर्व विषयांना समग्रपणाने स्पर्श करणारा असा ग्रंथ हातात येतो अाहे. 
 
‘हिंदू धर्म’ असे त्याचे नाव अाहे. हा ग्रंथ मुळात कांचीचे परमपूज्य परमाचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजी यांनी तमीळ भाषेत लिहिला. त्यांचे इंग्रजीत भाषांतरण झाले. हे घेऊन सोलापूरचे उद्योजक सत्यराम म्याकल माझ्याकडे आले. ग्रंथ माझ्या हाती दिला. म्हणाले, ‘माझी इच्छा आहे, की हा ग्रंथ मराठीतून यावा.’ मला आश्चर्य वाटले की, एक तेलुगु भाषिक एवढा मोठा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ मराठी भाषकांच्या हाती जावा, या तळमळीने येतो. माझ्या मनात प्रश्नही होता, की एवढ्या मोठ्या ग्रंथाचे इतक्या समर्थपणाने भाषांतर करणे ही काही सोपी गोष्ट नाही. पण म्याकल यांची कांची कामकोटी पीठाशी असलेली श्रद्धा पाहिली, धडपड पाहिली. क्षणभर विचार केला. आपल्याकडून तर त्यांना भाषांतराचा विचार नाही ना..? पण मी माझ्या मर्यादा आेळखत होतो, वेळेची अनुपलब्धी, सततचा प्रवास यामुळे अशक्यच होतं. 
 
क्षणात माझ्या डोळ्यासमाेर नारायणकाका कुलकर्णींचे नाव आले. त्यांना आपण सर्वजण आेळखतोच. ‘ज्ञानेश्वरी’चे अभ्यासक म्हणूनही पाहतो. त्यांनी आेवीबद्ध केलेल्या ‘ज्ञानेश्वरी’चे भाषांतर आपण वाचलेले आहात. हा साहित्यिक खरोखर या ग्रंथाला न्याय देईल, असे मला वाटले. मी म्याकल यांना म्हणालो, ‘काका कुलकर्णींना भेटा. माझी इच्छा सांगा.’ हे सगळं सांगताना, मला नारायण काकांची तब्येत, त्यांची प्रकृती या विषयी एक प्रश्नचिन्ह माझ्या मनात होतं. तरीही ते करू शकतात, याची खात्री होती. काकांनी हे काम समर्थपणे पेलले. दुसरीकडे एक तेलुगु भाषक, मराठी ग्रंथासाठी धडपड करतो आहे. त्यांचीही गुरूनिष्ठा सफल झाली. काकांनी भाषांतर करताना अनेक प्रकारच्या ग्रंथांचा आधार घेतला. तत्त्वज्ञान नीट समजावून घेतले. त्यामुळेच हा समग्र ग्रंथ मराठी वाचकांच्या हाती येतो आहे. 
 
कांची कामकोटी पीठाचे ६८ वे शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी मूळ तमीळ भाषेत ‘हिंदू धर्म’ या ग्रंथ लिहिला. त्याचे इंग्रजीत भाषांतर झाले. त्यानंतर साेलापूरच्या नारायणकाका कुलकर्णी यांनी त्याचा मराठी अनुवाद केला. उद्योजक सत्यराम म्याकल यांच्या प्रयत्नांनी रविवारी त्याचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त ख्यातनाम निरूपणकार विवेक घळसासी यांनी पाठवलेला हा संदेश... 
बातम्या आणखी आहेत...