आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमाणी-पटेल प्रतिष्ठानतर्फे डॉ. साळुंखे, सचिन पिळगावकर यांचा सन्मान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दमाणी-पटेल प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहाच्या खुल्या पटांगणात होता. परंतु शहरातील केबल बंद, मंगळवारी वर्तमानपत्रे नव्हती. त्यामुळे गर्दी होईल की नाही, या शंकेने कार्यक्रम सभागृहात झाला. पण, डॉ. साळुंखे यांना ऐकण्यासाठी आणि सचिनला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. सभागृह तुडुंब भरले. बाहेरील पटांगणही भरले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. मंचावर ज्येष्ठ उद्योगपती प्रेमरतन दमाणी, बिपीनभाई पटेल होते. 
 
सोलापुरी चादरीसारखा मी टिकाऊ : सचिन 
‘मी सोलापूरच्या चादरीसारखा आहे. वर्षानुवर्षे टिकाऊ. ते हाताने धुवावे लागते. मशीनमध्ये घालून चालणार नाही. त्यासाठी हात बळकट असावेत. त्याचप्रमाणे माझ्यासारख्या कलावंतांना हाताळायला हात मजबूत लागतात. माझे पहिले गुरू राजाभाऊ परांजपे. त्यांच्या हाताखाली काम केले. मीनाकुमारी ज्यांना मी मीनाआपा म्हणायचो. यांच्यामुळे उर्दूची आवड निर्माण झाली. वयाच्या नवव्या वर्षांपासून उर्दूत विचार करत होतो. सुबोध भावे जेव्हा ‘कट्यार काळजात घुसली’मधील भूमिका घेऊन आला, तेव्हा माझ्या उर्दूचे वेड समजले. खरे पाहता, सर्वांचा विश्वास स्क्रिप्ट रायटरवरतीच असतो.
 
 माझी योग्यता नसतानाही हा पुरस्कार मिळाला. खरे पाहता, एका बाजूला सुशीलकुमार शिंदे आणि दुसऱ्या बाजूला डॉ. साळुंखे बसले. तोच माझा मोठा सन्मान. पण, हा मनापासून केलेला सोहळा आवडला. टेलिव्हिजनसाठी हा काही इव्हेंट नाही, याचाही मनस्वी आनंद झाला. हा सोहळा मी कधीच विसरणार नाही.’ 
 
राजकारणातले ज्ञान शून्य : राजकारणाचा माझे ज्ञान म्हणजे त्या बाईसारखा. जिला आदेश बांदेकरने ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात विचारले होते, की भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण? बाईंनी लगेच उत्तर दिले, शरद पवार. (प्रचंड हशा)  
 
विद्रोही तुकाराम वाचायचंय : डॉ.साळुंखे यांनी लिहिलेला विद्रोही तुकाराम वाचायचे आहे. त्यासाठी पत्ता घेतलाय. या वाक्यावर साळुंखे म्हणाले, ‘पुस्तक लगेच देतो.’ सचिन म्हणाले, ‘आजच देतो म्हणजे घरी येऊ नका.’ (पुन्हा हशा) 
 
तेव्हा भारतीय म्हणून... शरदया नावाने वडिलांचे नाव पूर्ण होते. त्यामुळे शरद पवार वडिलांच्या जागी. राजकारणाचे ज्ञान शून्य असले तरी देशाला जेव्हा माझी गरज लागेल, त्या वेळी भारतीय म्हणून काहीही करायला तयार. (टाळ्या) 
 
बुद्धांना समजूनच घेतले नाही : डाॅ. साळुंखे 
‘तथागत गौतम बुद्धांना भारतीय समाजाने समजून घेतले नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. मी या प्रकारची विधाने करताना विषयाच्या मुळाशी जातो. त्याशिवाय मी बोलत नाही. गौतम बुद्धांकडे पाहिले तर आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि महिलांचे अधिकार खऱ्या अर्थाने कळतात.’ 
 
एकदा कालाम नावाचा समूह तथागत बुद्धांकडे गेला. त्यांनी विचारले की, ‘आमच्याकडे अनेक प्रकारची माणसे येतात. अनेक गोष्टी सांगतात. त्यातून काय घ्यावे, काय नाकारावे कळत नाही. त्यांची कसोटी कशी ठरवावी?’ 
 
गौतम बुद्ध अतिशय नम्रपणे म्हणाले, “कालामांनो, ‘एखादी गोष्ट धर्मग्रंथांनी किंवा विद्वानांनी सांगितली म्हणून स्वीकारू नका. स्वत: अनुभवा, जाणकारांना आलेला अनुभव पाहा. काळाच्या कसोटीत सृष्टीतले सत्य म्हणून त्याचा स्वीकार करा. मानव विकासाची प्रगती याच पद्धतीने झाली आहे. कुठल्याही गोष्टीची चिकित्सा झाली पाहिजे. त्याच्याशिवाय स्वीकारणे गैर आहे, हेच बुद्धांचे सूत्र होते.’ 
 
स्वातंत्र्याचे महत्त्व : अहंभट नावाचा एक तरुण आला. त्याने बुद्धांकडे स्वातंत्र्याचा अर्थ विचारला. त्याला बुद्ध म्हणाले, ‘छोटी चिमणीदेखील तिच्या घरट्यात स्वतंत्रपणे चिवचिवते. आपण तर माणसे आहोत, हे वेगळे सांगण्याची काही गरज...?’ 
 
सुटीतगुरे राखली : मी छोट्या गावातून आलो. आई वारकरी परंपरेतली. थोरले बंधू पांडुरंग हेच माझे पहिले गुरू. पण, घरची गरज म्हणून मला गुरे राखावी लागली. शिक्षक चांगले मिळाले म्हणून पुढचे शिक्षण आणि पीएच. डी. करता आली. 
 
चार्वाकाची प्रतिमा : संशोधनाला सुरुवात केली तेव्हा चार्वाक कळला नव्हता. चकाेर, चातकासारखा पक्षी असावा, असे वाटावे इतकेच ज्ञान. संशोधनाअंती सिद्ध केले की, चार्वाकाची प्रतिमा खरी नाही. त्यांच्याविषयी आक्षेपार्ह मांडणी झाली. 

कार्यक्रमाचे मुख्य संयोजक वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी आभार मानले. प्रा. ज्योती वाघमारे यांच्या खुमासदार शैलीच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आली.
बातम्या आणखी आहेत...