उस्मानाबाद - कोऱ्याबॉन्ड धनादेशांमुळे सहकार विभागाने छापे टाकलेल्या शहरातील दोन सावकारांनी नेमकी किती मालमत्ता गहाण ठेवून घेतली आहे, याचा हिशेब लावणे अधिकाऱ्यांना अवघड झाले आहे. सावकारांकडचे घबाड पाहून अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे सर्व साहित्य सुपूर्द करून गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. शहरातील शेरखाने पेट्रोल पंपासमोर साईनगर येथे वास्तव्यास असलेल्या मनोज विश्वनाथ हिरगुडे त्यांच्या सासू आशा सुधीर जाधव (रा. सांजा रोड, उस्मानाबाद) यांच्या घरांवर सहकार विभागाच्या दोन स्वतंत्र पथकांनी शुक्रवारी (दि. ६) सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास एकाच वेळी छापा मारून तपासणी करत घरातील कागदपत्रे ताब्यात घेतली.
साडेतीन तास कारवाई करून दोन्ही घरातून कोरे धनादेश, बॉन्ड, व्यवहाराच्या नोंदी असलेल्या बॉन्डच्या झेरॉक्स, नोटरी केलेले बॉन्ड, चेकबुक, वाहनाचे आरसी बूक, नोंदी असलेल्या वह्या, भिशीच्या नोंदी असलेल्या डायऱ्या आदी साहित्य जप्त करण्यात आले. शहरातील एका महिलेने घरातील लग्न कार्यासाठी गरज असल्याने घराचे कागदपत्रं गहाण ठेवून हिरगुडे याच्याकडून लाख रुपये व्याजाने घेतले होते. रक्कम परत करूनही हिरगुडे यांच्याकडून घराची कागदपत्रे देण्यास टाळाटाळ होत होती.
यामुळे महिलेने तक्रार दाखल केल्यावर कारवाई झाली. हिरगुडे यांच्या घरातून पाच कोरे बॉन्ड, लिहिलेला बॉन्ड, नोटरी केलेला बॉन्ड, व्यवहाराची नोंद असलेल्या बॉन्डची झेरॉक्स, दोन कोरे धनादेश, चार व्यवहाराच्या नोंदी असलेली डायऱ्या एक आरसी बुक आदी साहित्य जप्त करण्यात आले. जाधव यांच्या घरात १८ कोरे धनादेश, दोन लिहिलेले धनादेश, तीन कोरे बॉन्ड, चार लिहिलेले बॉन्ड, एक चेकबुक, एक खरेदीखत, २३ विविध बँकांमध्ये असलेल्या खात्यांचे पासबुक, तीन भिशीच्या व्यवहाराची नोंद असलेले रजिस्टर, एक आरसी बुक, तक्रारदाराच्या व्यवहाराची नोंद असलेले कागदपत्रे सापडली. गेल्या चार दिवसांपासून या कागपत्रांचा सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी अभ्यास करत आहेत. मात्र, त्यांना अद्यापही दोघांच्या व्यवहाराचा तपशील तयार करण्यात आलेला नाही. कोऱ्या दस्तांमुळे गहाण हडप केलेल्या मालमत्ता समजण्यात अडचण येत असल्याचे समजते.
पोलिसांकडे देणार दस्त
दोन्ही सावकारांकडे सापडलेले धनादेश, बाॅन्ड, दस्त पोलिस ठाण्यात जमा केले आहेत. जिल्हा उपनिबंधक के. बी. वाबळे यांनी सोमवारीच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अादेशाची प्रत मंगळवारी सहाय्यक निबंधक कार्यालयास मिळाली. दोन दिवसांत गुन्हा दाखल होऊ शकतो.
तातडीने हव्यात हालचाली
छाप्यानंतर सावकारांवर महाराष्ट्र सावकरी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. अधिक दिवसांचे अंतर असल्यास न्यायालयात गुन्हा सिद्ध करताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे गुन्हा दाखल करण्याची हालचाल वेगाने होणे आवश्यक आहे.