आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताडीचे घेतले नमुने, पुन्हा सुरू दुकाने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मोदी येथील ताडी दुकानासमोर शनिवारी एकाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर हे दुकान बंद होते. रविवारी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुकान उघडून ताडीचे काही नमुने घेतले. मुंबईच्या प्रयोगशाळेत त्याचे रासायनिक पृथ:करण होईल. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल असे खात्याचे अधीक्षक सागर धूमकर यांनी सांगितले. त्यानंतर हे दुकान पूर्ववत सुरू झाले. १५ सप्टेंबरला न्यू पाच्छा पेठेतील ताडीच्या दुकानात सायंकाळी साडेसातच्या सुमारास एकाचा संशयास्पद मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी उत्पादन शुल्क खात्याने त्या दुकानातील काही नमुने घेतले. त्याचाही अहवाल अद्याप यायचा आहे. या जुजबी कारवाईनंतर मोदी आणि न्यू पाच्छा पेठेतील दोन्ही दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू आहेत. १५ सप्टेंबर ते १९ या पाच दिवसांत तिघांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यातील एका बेवारस मृतदेहावर पोलिसांनीच अंतिम संस्कार केले. दुसऱ्या मृतदेहाबाबत कुटंुबीयांचीच तक्रार नव्हती. तिसऱ्या मृतदेहासंबंधी सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली. मोदी येथील ताडी दुकानासमोरच विलास सिद्राम माढेकर (वय २६) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सिव्हिल चौकीत प्राथमिक नोंद झाली. पुढील कारवाईसंबंधी पोलिसांनी उत्पादन शुल्क खात्याकडे बोट दाखवले.

अन्न औषध प्रशासन?
उत्पादनशुल्क खात्याप्रमाणेच अन्न औषध प्रशासनही नमुने घेऊन प्रयोगशाळेला पाठवू शकते. अप्रमाणित ताडी विक्रीप्रकरणी खटला भरण्याची तरतूद आहे. परंतु हे खातेही गप्पच आहे.

आठ दिवसांत अहवाल
ताडीचे नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्याचा अहवाल आठ दिवसांत येईल. त्यानंतर संबंधित परवानाधारकावर कारवाई करू. सागरधूमकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क