आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या महिलेचे बेकायदा गर्भलिंग निदान, 7 अटकेत; डॉक्टरला बेड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेंभुर्णी (जि. सोलापूर)- रांझणी देवाची (ता. माढा, जि. सोलापूर) येथे बीड जिल्ह्यातील एका २७ वर्षांच्या गरोदर महिलेची मशीनद्वारे बेकायदा गर्भलिंग तपासणी  करताना पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून डॉक्टर, गरोदर महिलेसह सात जणांना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी फरार असून सातही जणांविरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, माढा न्यायालयाने सातही आरोपींना १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  
 
रांझणी देवाची (ता. माढा) येथे दलालामार्फत बीड जिल्ह्यातील २७ वर्षीय महिलेवर मशीनद्वारे गर्भलिंग निदान केले जाणार असल्याची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विकास विश्वनाथ चव्हाण यांच्या घरात बीड येथील महिलेवर गर्भलिंग मशीनद्वारे तपासणी करत असताना त्यांना पकडले. या प्रकरणी घरमालक विकास चव्हाण, डॉ. संतोष निंबाळकर त्याचा सहकारी गजानन अण्णासाहेब कुंभार (दोघे रा. राजळे, ता. फलटण, जि. सातारा), दुसरा दलाल शिवाजी किसन देशमुख (रा. कन्हेर इस्लामपूर, ता. माळशिरस), महिलेचा पती सुरेश पोथीराम शेळके (वय ३३), महिलेची आत्या छटकाबाई मारुती सावंत, कार चालक राजू तुकाराम लोखंडे (सर्व रा. पिंपरी घाटा, ता. आष्टी, जि. बीड) अशा सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील दलाल अमर जाधव (रा. रांझणी, ता. माढा) हा संशयित आरोपी फरार झाला. या गुन्ह्यातील चार लाख रुपये किमतीची गर्भलिंग तपासणी मशीन आणि ओम्नी कार यासह पाच लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक आनंद खोबरे तपास करत आहेत.   

एका चाचणीसाठी १२ हजार    
फलटण येथील डॉ. संतोष निंबाळकर हा माळशिरस तालुक्यातील शिवाजी जाधव व माढा तालुक्यातील अमर जाधव या दलालांमार्फत गर्भलिंग निदान करण्यासाठी येत होता. एका चाचणीसाठी तो १२ हजार रुपये  घेत असे. हा डॉक्टर सापडल्यामुळे टेंभुर्णी परिसरात गर्भलिंग निदान होत असल्याचे स्पष्ट झाले असून त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. अकलूज येथील गर्भलिंग निदानाची घटना ताजी असतानाच दुसरी घटना उघडकीस आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. निंबाळकरने आणखी किती महिलांचे गर्भलिंग निदान केले याचा पोलिस तपास करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...