आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरून वाहतूक; 5 ठिकाणी हप्ते, वाळूमध्ये झाली तिप्पट दरवाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - वाळूचे लिलाव संपल्याने साठा करून ठेवलेल्या वाळूवर जिल्ह्यातील बांधकामे सुरू आहेत. साठा केलेली वाळू जिल्ह्यात नाही तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर भागातून येते. मात्र छुप्या मार्गाने येणाऱ्या वाळूचे दर कमालीचे वाढले आहेत. वास्तविक, नदीच्या जवळपास साठा केलेली वाळू जागेवर १२ हजारात मिळते. मात्र, बांधकामाजवळ येईपर्यंत तिचा दर तिप्पट म्हणजे ३५ हजारांपर्यंत जातो. यासाठी गंगाखेड ते उस्मानाबाद आणि बेगमपूर ते उस्मानाबादरम्यान पाच ठिकाणी हप्ता द्यावा लागत असल्याचे वाहनधारक सांगतात.

 

जिल्ह्यातील कुठल्याही बांधकामावर वाळूचा वापर सुरू आहे. परंडा, गंगाखेड, माजलगाव, बेगमपूर, अक्कलकोट आदी भागातून उस्मानाबादला वाळू येते. बहुतांश भागातील वाळूचे लिलाव सप्टेंबर महिन्यात संपले आहेत.काही ठिकाणी एक-दोन घाटाचे लिलाव झाले असले तरी लिलाव झालेल्या भागातूनही वाळूचा उपसा सुरू आहे. छुप्या मार्गाने वाळूचा उपसा सुरू असला तरी रात्रीतून वाळूची विल्हेवाट लावली जाते. नियमानुसार वाळूचा साठाही करता येत नाही. वाळूची टंचाई दिसत असली तरी वाळू वापरूनच शहरात तसेच ग्रामीण भागात बांधकामे सुरू दिसतात.लिलाव नसतानाही बांधकामांना वाळू येते कोठून, असा प्रश्न प्रशासनालाही पडत नसावा? खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच शासकीय इमारतीचे काम सुरू आहे. या कामासाठीही वाळूचा वापर होतो. तसेच जिल्ह्यात अन्य भागातही शासकीय इमारतींचे बांधकाम वाळू वापरूनच केले जात आहे. असे असले तरी प्रशासन वाळू कोणत्या मार्गाने येते, याचा शोध घेत नाही, हे विशेष. किंबहुना प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांची या छुप्या व्यवसायाला साथ असल्याचे वाहनधारकांतून सांगितले जात आहे.

 


उस्मानाबाद शहरात वेगवेगळ्या भागात बांधकामांवर सध्या ४५ ते ५० वाहनाद्वारे आणून वाळू विकली जात आहे. यापैकी बहुतांश वाहने गंगाखेड, अक्कलकोट भागातून वाळू आणतात. एका टिप्परमध्ये चार ब्रास वाळू बसते. नदीजवळून वाळू आणण्यासाठी टिप्परला १० ते १२ हजार रुपये आकारले जातात. शेतात साठा करून ठेवलेली ही वाळू रातोरात भरली जाते. सकाळी आठ वाजेपूर्वी शहरात वाहने दाखल होतात. रात्रीतून एका टिप्परच्या वाळूचा दर ३५ हजार रुपयांवर जातो. गेल्या दोन महिन्यापूर्वी २५ हजारात मिळणारी वाळू सुमारे १० हजार रुपयाने महाग झाल्याने बांधकामाचे दर वाढले आहेत. तयार घराच्या किंमतीमध्येही वाढ होत आहे.त्यामुळे सामान्यांचे घरांचे स्वप्न धुसर बनत आहे. बहुतांश सामान्य बांधकामधारकांनी मात्र वाळूच्या महागाईमुळे बांधकामे बंद ठेवणेच पसंत केले आहे. वाळूचे दर गगनाला भिडण्यासाठी महसूल तसेच पोलिस यंत्रणेतील हप्तेखोरी मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान,बहुतांश घाटांचे वाळू लिलाव अजूनही झालेले नाहीत. लिलाव होईपर्यंत छुप्या मार्गाने येणाऱ्या वाळूचे दर वाढलेलेच राहतील, हे मात्र निश्चित.

 

कारवाया सुरूच
लिलाव झालेल्या काळात वाळू भरण्यासाठी वाहनधारक १० हजार रुपये मोजतात. उस्मानाबादपर्यंत येईपर्यंत हजार रुपयांचे इंधन लागते. चालकासाठी ५०० रुपये, असा साडेसोळा हजार रुपये खर्च येतो. मात्र, बांधकामधारकांकडून २५ हजार रुपये घेतले जातात. वाहनधारकांच्या मते एका खेपेला किमान दोन ते हजार रुपये हप्त्यासाठी वेगळे द्यावे लागतात. त्यामुळे वाळूचे दर वाढत आहेत.तर लिलाव बंद असलेल्या काळात जागेवर १२ हजार रुपये, वाहनासाठी इतर खर्च दोन हजार रुपये हप्त्यासाठी दोन ते हजार रुपये द्यावे लागतात, असे वाळू वाहनधारकांनी नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

 

असा वाढतो दर
लिलाव झालेल्या काळातही वाहनातून केवळ दोन ब्रास वाळू आणण्याची परवानगी असते. मात्र, मोठ्या वाहनातून कमी वाळू आणणे हे वाहनधारकांना परवडत नाही. त्यामुळे टिप्परसारख्या वाहनातून किमान चार ब्रास वाळू आणली जाते. खचाखच भरलेल्या वाहनावर ओव्हरलोडच्या नावाखाली प्रशासकीय यंत्रणेकडून कारवाई होते. ही कारवाई टाळण्यासाठी थेट यंत्रणेला हप्ते दिले जातात. तर हप्त्याचे कारण सांगून बांधकामधारकांकडून वाळूचे दर वाढविले जातात. लिलाव असलेल्या काळात नदीच्या परिसरात ते १० हजारात टिप्पर भरून वाळू मिळते. मात्र ती बांधकामाजवळ येईपर्यंत २५ ते ३० हजारांपर्यंत जाते.

बातम्या आणखी आहेत...