आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील हागणदारी ठिकाणांना आज पथक अचानक देणार भेटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा महापालिकेने ३० जून रोजी केली. त्यानुसार पाच जणांची राज्यस्तरीय समिती शहरातील स्वच्छता तसेच हागणदारी भागाची पाहणी करण्यासाठी सोमवारी सोलापुरात दाखल झाली आहे. या पथकाने आज केगाव, बाळे, चंडक बगीचा, नेहरू नगर शाळा, अंबिका नगर, लष्कर परिसर इतर ठिकाणाची सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली. तसेच मंगळवारी पहाटे हागणदारी ठिकाणे, मनपा शाळा, महाविद्यालय, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणची पाहणी करणार आहे.
 
शहरात आलेल्या राज्यस्तरीय समितीचे स्वागत महापालिकेच्या वतीने महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. हागणदारी मुक्तीची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचे प्रादेशिक उपसंचालक विजय कुलकर्णी, नाशिक जिल्हा प्रशासन अधिकारी मारुती खोडके, स्वच्छ महाराष्ट्र मिशनचे पंकज काळवाघे, परिश्रम ग्रामीण विकास संस्था मंगळवेढाचे अशोक लेंडगे, पत्रकार अभय दिवाणजी यांचा समावेश आहे.
 
महापालिकेच्या स्वागतानंतर बोलताना समितीचे विजय कुलकर्णी म्हणाले, हागणदारीमुक्ती ही लोकचळवळ व्हावी. शहरात हागणदारी मुक्ती झाले असेल तर तसा अहवाल शासनाकडे जाईल. शासनाचा निधी मिळण्यासाठी मदत होईल. यावेळी पंकज काळवाघे, अशोक लेंडगे, सभागृह नेता सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी, परिवहन सभापती दैदिप्य वडापूरकर, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, सहा.आयुक्त अभिजित हराळे आदी उपस्थित होते.
 
समितीच्या सदस्यांनी सकाळी महापालिकेत कागदपत्रांची तपासणी केली. दुपारी शहरातील सार्वजनिक शौचालय, हागणदारीचे ठिकाण, हद्दवाढ भाग, गावठाण भागातील वैयक्तिक सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली. यावेळी काही त्रुटी आढळून आल्या. मात्र त्याबाबत समितीच्या सदस्यांनी मत व्यक्त केले नाही.
 
अहवाल शासनास देणार
राज्यस्तरीयसमिती १० आणि ११ जुलै रोजी शहरातील स्वच्छतेची पाहणी करणार आहे. शहरात अचानक भेट देतील. त्यांचा अहवाल शासनाकडे गोपनीय पद्धतीने सादर करतील. त्यानुसार पुन्हा केंद्र सरकारची एक समिती पाहणीसाठी येईल. याबाबत माहिती देता शासनाकडे ते सादर करण्यात येईल, असे कुलकर्णी म्हणाले.
 
दोन पथकाची नेमणूक
समितीच्या सदस्यांनी दोन पथक तयार करून सोमवारी शहरात विविध हागणदारी ठिकाणांची पाहणी केली. सायंकाळी संयुक्त बैठक घेऊन तयारी केली. मंगळवारी पहाटे संवेदनशील भागात समितीचे सदस्य पाहणी करतील.
 

लष्कर : उघड्यावर शौच
समिती शहरात असताना लष्कर, शासकीय रुग्णालय परिसरात उघड्यावर शौचालयास बसत असल्याचे दिसून आले.

स्वच्छता समितीने श्राविका शाळेतील स्वच्छता गृहाला भेट दिली प्राचार्यांकडून माहिती घेतली. कासलीवाल बोळात उघड्यावर शौचास बसत होते. त्या ठिकाणी स्वच्छता समितीने भेट दिली. त्यावेळी वॉर्ड अॉफिसरला प्रश्न विचारले असता समाधानकारक उत्तरे आली नाहीत. सायंकाळपर्यंत मला माहिती द्या, असे त्यांना सांगितले.

होम मैदान-सोलापूर महानगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत उघड्यावर शौचास बसाल तर रेशनकार्ड, मतदार आेळखपत्र रद्द होणार असे फलक शहरातील विविध भागात लावले आहेत. स्वच्छता समिती येणार म्हटले की फलक झळकले.
बातम्या आणखी आहेत...