आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द, ५० संघटना उतरल्या रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध ५० संघटनांचे कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे विकृत मनोवृत्तीच्या विठ्ठल तिडके याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 
 
छत्रपती शिवराय राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विरोधात तिडके याने अवमानकारक शब्द उच्चारले आहेत. यामुळे सर्वत्र याचा धिक्कार करण्यात येत आहे. याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. याचे लोण उस्मानाबाद येथेही पोहोचले. विविध संघटनांनी एकत्र येऊन या मनोवृत्तीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि. २५) शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. कोणत्याही प्रकारे शांततेला बांधा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आला. 

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर गेटजवळ सर्व मोर्चेकरी शांतपणे थांबले. शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये तिडके याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 

या घटनेचा यावेळी तीव्र निषेधही करण्यात आला. यावेळी एम. डी. देशमुख, विश्वास शिंदे, धनंजय शिंगाडे, धर्मवीर कदम, पांडुरंग लाटे, अंबादास दानवे, शमीयोद्दीन मशायक, नितीन शेरखाने, विष्णू इंगळे, सुरेश शेरखाने, महादेव माळी, अॅड. मनीषा राखुंडे, संपत डोके, दत्ता बंडगर, माणिक बनसोडे, मसूद शेख, मुकेश नायगावकर, इलियास पिरजादे, संजय मुंडे, संजय वाघमारे, रोहित निंबाळकर यांनी भाषण केले. मार्चात सर्व जात, धर्म पंथातील नागरिक सहभागी झाले होते. 

५० संघटनांचा सहभाग : मोर्चामध्येविविध समाजातील ५० संघटनांचा सहभाग होता. जिल्हा विधिज्ञ मंडळ, ऑल इंडिया जमियतुल कुरेश, चर्मकार महासंघ, व्यापारी महासंघ, गुरव समाज, शिवराज्यअभिषेक समिती, जिजाऊ ब्रिगेड, कोळी समाज संघ, ब्राम्हण महासंघ, विद्यार्थी वाहतूक संघटना, फुले - आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव, मनसे शिक्षक सेना, नाभिक महामंडळ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, युवासेना, नागबोधी संघटना, मनसे, भारतीय बौध्द महासभा, संभाजी ब्रिगेड, सावित्रीबाई फुले जन्मोत्सव समिती, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, जमियत अहले हदिस, काँग्रेस पक्ष, राजमाता प्रतिष्ठाण, भाजप, मुस्लिम आरक्षण समिती, वीरशैव जंगम मठ, बहुजन क्रांती मोर्चा, शिवसेना, धारासूर मर्दिनी कलामंच, छावा, फुक, राष्ट्रवादी, वंजारी समाज संघटना, मुस्लिम युवा संघटना, धनगर समाजोन्नती मंडळ, पतंजली योग समिती अादीचा सहभाग होता. 

वाहतुकीलाही नाही अडथळा 
शहरातील मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढण्यात आला. मात्र, सहभागी झालेल्या हजारो मोर्चेकऱ्यांनी वाहतुकीलाही अडथळा होणार नाही, याची दक्षता घेतली. याच परिसरात जिल्हा न्यायालय, बँका विविध शासकीय कार्यालये आहेत. तेथील कामकाजाला बाधा येऊ नये म्हणून शांततेत मोर्चा काण्याची दक्षता यावेळी सर्व संघटनांनी घेतली. 

‘नवा विचार, नवी दिशा’ 
महापुरुषांची बदनामी झाली तर विशिष्ट समाजातील नागरिकच निषेध व्यक्त करतात. मात्र, या मोर्चातून ‘महापुरुष सर्वांचे, ना कोणत्या जातीचे, धर्मांचे’ ‘माझा राजा शिवाजी राजा’ हा विचार मांडण्यात आला. तसेच ‘समाजकंटकाला कोणतीही जात, धर्म नसतो’ या विचाराचीही पेरणी केली. महापुरुषांना विविध जातींमध्ये बंदिस्त करणाऱ्यांना सर्व संघटनांनी यातून मोठी चपराक दिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...