आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी काळविटाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ - पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकताना अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या कळविटावर कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. ५) पहाटे साडेपाचच्या सुमारास मंगळवेढा रस्त्यावर कामतीजवळील पाटील वस्तीजवळ ही घटना घडली.

पहाटे कामती येथे मंगळवेढा रस्त्यावर अज्ञात वाहनाने काळविटाला धडक दिल्याने ते जखमी झाले. त्यानंतर रस्त्याच्या कडेला पडलेल्या जखमी काळविटावर कुत्र्यांनी हल्ला करत त्याचा लचका तोडला. त्यात ते गतप्राण झाले. गेल्याच महिन्यात हरणाचे पाडस लोकवस्तीत येताच त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असताना पुन्हा पाण्यासाठी काळविटाला जीव गमवावा लागला. शासन वन्यप्राण्यांची जपणूक करण्यासाठी विविध योजना राबवत असताना मोहोळ तालुक्यातील वन्यप्राण्यांची पाण्यावाचून तडफड सुरू आहे.

गेल्या तीन वर्षांपासून पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न िनर्माण झाला आहे. माणसांसह जनावरे वन्यजीवांचेही हाल होत आहेत. शेजबाभूळगाव, ढोकबाभूळगाव, कुरुल, अंकोली, सौंदणे, परमेश्वर पिंपरी, जामगाव, कोरवली, दादपूर, विरवडे, इंचगाव, बेगमपूर भागातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात हरिण, मोर, काळवीट, कोल्हे, लांडगे या प्राण्यांचा वावर आहे. मात्र, या भागात त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात वनविभाग अपयशी ठरत आहे. पाण्याचे हौद कुंड कोरडे पडल्याने या प्राण्यांना मनुष्यवस्तीत पाण्याच्या शोधात फिरावे लागते.
अहवाल पाठवला
दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र पाणीटंचाई आहे. वनातील सर्वच ठिकाणचे पाणी अटले आहे. याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. तसेच लवकरच पाण्याची व्यवस्था करू. आर. डी. सोनटक्के, वनरक्षक वनविभाग