आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्माच्या भिंती तोडून प्रेमविवाह, किडनी देऊन पतीला जीवदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जात, धर्म, पंथाच्या भिंती ताेडून प्रेम जुळले. सोबतीच्या आणाभाका घेतल्या, पण आक्रीत घडले. लग्नाआधीच प्रियकराची किडनी निकामी असल्याचे निदान झाले. भांबावलेल्या प्रियकराने तिला टाळण्याचा प्रयत्न केला, पण जिवापाड प्रेम करणाऱ्या युगुलाने अखेर विवाह उरकला. अखेर पत्नीने किडनी देऊन आपल्या पतीचे आयुष्य पुन्हा खेचून आणले. गोव्याच्या पणजीतील जोडप्याची ही कहाणी असून पतीचे आजोळ सोलापुरात असल्याने येथील यशोधरा रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. गोव्यातील नतेशा शेट्टी (२७) हिने पती समीर नदाफ (२८) यास किडनी देऊन जीवदान दिले. या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध होता. परंतु तो झुगारून २०१३ मध्ये हे जोडपे विवाहबंधनात अडकले. पणजीतील सांताक्रुझचे रहिवासी समीर व नतेशा २००८ पासून एकमेकांना ओळखत होते. २०१० पासून दीड वर्ष दोघे एका खासगी जहाजावर सोबतच काम करत होते. इंटरनॅशनल क्रूझशिपवर नोकरीसाठी समीरचे प्रयत्न सुरू होते.

त्यासाठी व्हिसा लागणार असल्याने त्याने अर्ज केला. तेव्हा वैद्यकीय तपासणीत एचबी नाॅर्मल नसल्याचे निदान झाले. तीन ते चार वेळा असाच अहवाल आला. अखेर २०१२ मध्ये एका तज्ज्ञ डाॅक्टरकडे तपासणी केली असता किडनी खराब असल्याचे निष्पन्न झाले. त्याआधी या आजाराची काहीही माहिती नव्हती. आजार कळल्यावर समीरने नतेशाला लग्नास नकार दिला होता. परंतु पुढे दोघांनी लग्न केले. त्यानंतर डायलिसिस सुरू करण्यात आले. पुढे प्रत्यारोपण करण्यात आले. भावंडांनी विरोध केला तरी नतेशा यांनी पतीला किडनी देण्याचा ठाम निर्धार निभावला. प्रत्यारोपणापासून अडचण नाही. माझी पत्नी आणि डाॅक्टरांमुळेच आज मी जिवंत आहे, असे उद््गार समीरने काढले आहेत.

आईने दाखवली होती किडनी देण्याची तयारी
डाॅक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा मार्ग सांगितला. समीरच्या आईने किडनी देण्याची तयारी दाखवली. परंतु ती जुळत नव्हती. त्यामुळे नतेशा यांनी तयारी दाखवली. समीरने हा प्रस्ताव नाकारला. परंतु पतीचा जीव वाचवण्यासाठी नतेशाने निश्चय केला. गोव्यातील शासकीय रुग्णालयात नोंदणीही केली. परंतु एक ते दोन वर्षे लागणार होती. त्यामुळे आॅनलाइन शोध घेऊन नतेशा यांनी सोलापूरचे यशोधरा रुग्णालय गाठले. समीरवर ३० एप्रिलला प्रत्यारोपण झाले आणि ११ मे रोजी सुटीही मिळाली.

वकिलाच्या मदतीने कागदपत्रे तयार केली
आंतरधर्मीय प्रेमविवाह असल्याने नदाफ कुटुंबीयांकडे काहीच कागदपत्रे नव्हती. त्यामुळे प्रत्यारोपणासाठी कोणी डाॅक्टर तयार होत नव्हते. अखेर पुण्यातील झोनल ट्रान्सप्लांट कमिटीशी संपर्क साधून कागदपत्रे तयार केली. वकिलांचीही मदत घेतली. यात चार महिन्यांचा काळ गेला. त्या कुटुंबीयांचे वारंवार समुपदेशन केले जात होते. पहिल्यांदाच अशी केस हाताळली आहे. - डॉ. संदीप होळकर, किडनी विकारतज्ज्ञ

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...