आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरकरांचा अभ्यास गुन्हा ठरतो का? शेषराव मोरे यांची मुलाखत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - “हिंदू, मुसलमान म्हणून पाहणे हे पाप आहे, हे सावरकरांचे विचार जातीयवादी आहेत का? त्यांचा अभ्यास केला म्हणून मी प्रतिगामी असल्याचा शिक्का मारण्यात आला. सावरकरांचा अभ्यास करणे गुन्हा आहे का? मी सेक्युलरच... माझे विचार समजून घ्या...” अंदमान येथे झालेल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे सांगत होते. शुक्रवारी त्यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला भेट दिली. अंदमानचे संमेलन, साहित्यातील पुरोगामी आणि प्रतिगामी यासंबंधी त्यांनी संवाद साधला.
प्रश्न : दाभोलकर, पानसरे हत्या किंवा काश्मीरच्या मुद्द्यावर जातीय आणि धार्मिक चर्चा वाढलेली दिसते. तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडताहेत. एकूणच काय वाटते?
मोरे : दाभोलकर तर सावरकरांचेच काम करत होते. पानसरे कुठल्याही धर्माच्या विरोधात बोललेले नाहीत. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातून त्यांनी शिवरायांचा खरा इतिहासच मांडला; पण बुद्धिवादी परंपरेची हत्या सुरूच राहिली. ती काही नवीन नाही. चार्वाकापासून आहे. यातून एखाद्या चळवळीकडून दुसरी चळवळ मोडणे असे कधीच झालेले नाही. विचारांची हत्या होते; परंतु माणसांची होत नाही. त्याने लाेकांमध्ये चीड निर्माण होते. डॉ. दाभोलकर गेले. त्याचे वाईटच वाटले; पण निर्माण होणाऱ्या अतिरेकी गटाचे चित्र भयानक अाहे.
प्रश्न : अंदमानातील भाषणाकडे आपण कसे पाहता?
मोरे : कुमार सप्तर्षी, प्रकाश बाळ यांनी सावरकर किंवा माझी पुस्तके वाचलेली नाहीत. ही बुद्धिवादी अन् धर्मनिरपेक्ष मानली जाणारी मंडळी आहेत. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म परलोकापुरता ठेवणे. कायदा, सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि नीतिमूल्ये या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या पाळल्याच पाहिजेत. मी पाळतो म्हणजे मी सेक्युलरच. फक्त सावरकरांचा अभ्यास केला म्हणून धर्मनिष्ठेचा शिक्का मारतात. सावरकरांचा अभ्यास करणे गुन्हा आहे का?
प्रश्न : आपण पुरोगामी दहशतवाद म्हणून उल्लेख केला. नेमके काय म्हणायचे आहे?
मोरे : अध्यक्षपदासाठी हिंदू विचारांच्या शेषराव मोरे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची बातमी पुण्यातल्या दैनिकात प्रसिद्ध झाली. त्याला मी आक्षेप घेतला. सावरकरांवर पुस्तक लिहिले मी म्हणून हिंदुत्ववादी? पुस्तकांमुळे हिंदुत्ववादी, सावरकरवादी असा शिक्का कसा मारता येईल? संमेलनात मी सावरकरांपुरतेच बोललो. सर्व पुरोगामी दहशतवादी नाहीत. एकही हिंदू किंवा मुसलमान बघायचे नाही. ते पाप आहे, हे सावरकरांचे विचार जातीयवादी आहेत का? पण हिंदू म्हटले की प्रतिगामी म्हणतात. त्याचीच भीती वाटते.
प्रश्न : सावरकर विज्ञानवादी होते तर धर्मावर चर्चा का करतात?
मोरे : सावरकरांना अनुयायीच नाहीत. त्यांच्या हिंदू महासभेत एकालाही सावरकर पटलेले नाहीत. सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म नव्हे. संघाचे हिंदुत्व म्हणजे हिंदूंवर अन्याय होऊ नये, एवढेच. देशातील २२ टक्के मुसलमान ५० टक्के वाटा मागतात. हा अन्याय नाही का? काँग्रेसने ४० टक्के वाटा दिला होता. तरीही मुसलमानांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा नाहीत, असे सावरकर म्हणाले होते. ते मुसलमानांच्या बाजूचेच होते; परंतु धार्मिक राजकारण करणाऱ्यांनी त्यांना हिंदुत्वात अडकवले.