आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात रस्त्याला अतिक्रमणाचा वेढा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रस्त्यात कुठेही अतिक्रमण दिसले की त्यावर महापालिकेचा हातोडा असतो. परंतु सात रस्ता येथे वसलेल्या अतिक्रमणाकडे महापालिकेचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय विश्रामगृहाच्या सुरक्षा भिंतीला लागून सात रस्ता चौकात फूटपाथवरच एकाने टपरी थाटली आहे. या परिसरात अतिक्रमणाचे प्रमाण वाढत आहे.
सात रस्ता परिसरात अतिक्रमणाचे प्रमाण वाढत आहे. बिग बझारच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण वाढत आहे. या रस्त्यावर सकाळी सात वाजता नाश्त्याचे पदार्थ करणा-या विक्रेत्यांची गर्दी असते. दुपारनंतर येथे खाद्य पदार्थांच्या चार चाकी गाड्या लागतात. यामुळे आर्धाच रस्ता शिल्लक राहतो. तसेच मौलाली चौक मार्गावरही खाद्य पदार्थाच्या गाड्या लागतात. त्यामुळे येथून जाणेच अवघड होते. रंगभवनकडे जाणा-या मार्गावरही अशीच परिस्थिती आहे. रस्त्याच्या कडेला गाड्या असल्यामुळे रिक्षा आणि बस रस्त्याच्या मध्यभागीच उभारतात. दुस-या दिशेने येणा-या मोठ्या वाहनांना जागाच नसते. त्याचप्रमाणे शर्मा स्विटच्या समोर चार चाकी गाड्यांनी रस्ता व्यापला आहे. सात रस्ता येथून बीएसएनएल कार्यालयाकडे जाताना समोर चौकात थंडपेयच्या गाड्या मोठ्या प्रमाणात लागतात. शिल्लक राहतो फक्त सात रस्ता ते यतिराज हॉटेलला जाणारा मार्ग.

फूटपाथवरील टप-यांचे अतिक्रमण सात रस्ता चौकातच फूटपाथवर थाटलेली टपरी.
शासकीय विश्रामगृहाच्या सात रस्त्याकडील गेटसमोरच अशा प्रकारे अतिक्रमण करण्यात आलेले आहे. रंगभवनकडे जाणा-या रस्त्यावर संगमेश्वर कॉलेजच्या भिंतीला लागून फूटपाथवर थाटण्यात आलेल्या टप-या.

टप-यांची संख्या वाढेल
अपघातहोऊ नये आणि पायी जाणा-यांना सोयीचे व्हावे याकरिता फूटपाथ तयार करण्यात आले आहे. मात्र आता फूटपाथवर अतिक्रमण होत आहेत. सात रस्त्यातील भर चौकात शासकीय विश्रामगृहाच्या सुरक्षा भिंतीला लागून फूटपाथवर टपरी उभारली गेली आहे. या टपरीवर दूध पंढरीचे नाव लिहिले आहे. याकडे दुर्लक्ष केले की, अशा टपरींची संख्या वाढण्यास वेळ लागणार नाही.

अतिक्रमण काढणार
टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व अतिक्रमण काढत आहोतच. कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाही. सोमवारीच सात रस्ता परिसरातील अतिक्रमण काढू. मोहन कांबळे, अतिक्रमण प्रतिबंधात्मक प्रमुख

४१ टप-यांचा विळखा
आइस्क्रीम,चायनिज, वडापाव, इडली वडा, कुल्फी, थंड पेय, चाय आदी गाड्यांनी सात रस्ता परिसर वेढला गेला आहे. बिग बझार समोर १५, संगमेश्वर महाविद्यालयासमोर १३, हुमा मेडिकल मार्गावर ८, बीएसएनएल कार्यालयासमोर गाड्या आहेत.

राजकीय दबाव
गेल्याकाही महिन्यापूर्वी अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु गाडीमालकांनी या परिसरातील नेतेमंडळींच्या मदतीने महापालिका गाठली. नेत्यांची ताकदीने प्रशासनाच्या प्रयत्नाला दाबले. त्यामुळे आजपर्यंत हे अतिक्रमण जैसे थे परिस्थितीत आहे.
बातम्या आणखी आहेत...