आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन योजना, एमआयडीसी लवकर मार्गी लावू: पालकमंत्री देशमुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- बार्शी उपसा सिंचन, एमआयडीसी या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच जलसंपदामंत्री उद्योग राज्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावू. पिकांच्या पंचनाम्याबाबत मुख्यमंत्री कृषिमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी येथील आढावा बैठकीत शनिवारी दिली. 

देशमुख म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामाच्या दर्जाबाबत प्राप्त तक्रारीनुसार चाैकशी करून दोषींवर कारवाई करू. कर्जमाफीसाठीच्या ऑनलाइन अर्जाच्या तक्रारी दूर करण्यात येतील. गरजेनुसार सरकार हमीभावानेच शेतमाल खरेदी करेल. रिक्त सहायक निबंधक पद भरण्यासाठी कार्यवाही करू, असे आश्वासन त्यांनी दिले. तालुका कृषी अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव पाठवा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तुळशीदास नगर पाणीपुरवठा योजनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना देऊन आमसभा घेण्याबाबत आमदारांनाही िवनंती करेन, असेही ते म्हणाले. 

माजी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, उपसा सिचनला दरवर्षी बजेटला २५-३० कोटी निधी मिळाल्यास तालुक्यातील १२५५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. एमआयडीसीही महत्त्वाचा प्रश्न असून त्यासाठी बैठक लावावी. पाऊस नसल्याने खरीप पिके गेली. याबाबतच्या स्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना द्यावी. सहा महिन्यातून एकदा आढावा बैठक आयोजित करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी संगणकीकृत सातबारा उताऱ्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. महसुली वसुलीचे ६८ टक्के काम झाले. विविध अनुदान योजनेमधील जुलैअखेरचे अनुदान जमा झाल्याचे सांगितले. गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शौचालयाचे ८४ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम, महावितरण विभागाने तालुक्यातील कामांची माहिती दिली. यावेळी अर्धवट असलेल्या कामांबाबत संबंधितांना पालकमंत्र्यांनी सूचना केल्या.अॅड. जीवनदत्त आरगडे, दीनानाथ काटकर, धैर्यशील पाटील, विक्रांत पाटील, शिवशंकर ढवण, प्रमोद पाटील, सुरेश कापसे, नवनाथ जगताप पांगरी, अमोल जाधव आदींनी प्रश्न मांडले. त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी आभार मानले. व्यासपीठावर नगराध्यक्ष असिफ तांबोळी, पंचायत समिती सभापती कविता वाघमारे, उपसभापती अविनाश मांजरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे यांच्यासह, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. 

बैठकीला सहकार विभागाची दांडी 
पालकमंत्र्यांच्याआढावा बैठकीला बार्शीतील सहायक निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती नव्हती. सहकार विभागाने पालकमंत्र्यांच्या बैठकीला दांडी मारली. नगरपालिकेचा आढावाही सभागृहात घेता नगरपालिकेतच उरकण्यात आला. काही कार्यालयाचा आढावा वेळेअभावी सादर करता आला नाही. 
बातम्या आणखी आहेत...