आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजा शेतकरी संघटनेने दहावा करून सरकारचा निषेध..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- सोलापूर जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. टँकरची मागणी करूनही जिल्हा प्रशासनाकडून पाणी मिळत नाही. नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करून त्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप सरकार करत आहे.
दुष्काळ जाहीर करूनही कुठलीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे या सरकारचा बळीराजा शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि.३) चंद्रभागा वाळवंटामध्ये प्रतिकात्मक दशक्रिया विधी घालून निषेध केला. या बरोबरच सरकारचा निषेध म्हणून बुधवारी (दि.४) पंढरपूर दौऱ्यावर असलेले राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची गाडी पंढरपुरातून फिरू दिली जाणार नाही, असा इशाराही बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली हळणवर यांनी दिला.

दशक्रिया विधी आंदोलना संदर्भात माहिती देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली हळणवर म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून बळीराजा संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. या मध्ये धरणे आंदोलन, रास्ता रोको, महसूल प्रशासनाचा मोर्चा काढून निषेध केला आहे. मात्र शेतकरी विरोधी विचारसरणीचे हे सरकार सत्तेवर आल्यापासून केवळ शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम करत आहे.

त्यामुळे या मुर्दाड शासनाचा चंद्रभागा वाळवंटामध्ये दशक्रिया विधी घालून निषेध नोंदवला आहे. बा विठ्ठला तूच आता या बळीराजाचा तारणहार आहेस, या वर्षी भरपूर पाऊस पडून शेतकऱ्यांना सुखी कर असे साकडे देखील श्री विठ्ठलाला घातल्याची त्यांनी माहिती दिली. या वेळी गणेश अंकुशराव, संग्राम गायकवाड, पंडीत बागल, महादेव नागटिळक, ज्ञानेश्वर जवळेकर, सोमनाथ भोसले, सोमनाथ घोगरे, गोपाळ पाटील, राजेंद्र नागटिळक, सोमनाथ मोरे, आबा चव्हाण, प्रशांत बागल, अमोल शिंदे, सोमनाथ ढोणे, शनी गव्हाणे आदी बळीराजा संघटनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

अर्थमंत्र्यांची गाडी अडवणार
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बुधवारी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावेळी त्यांचे शहरात विविध कार्यक्रम आहेत. या वेळी सरकारचा निषेध म्हणून त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवणार असल्याची माहिती माउली हळणवर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...