आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"विडी'चा निर्णय २५ रोजी, महिलांवरील संकट कायम, महिलेचा रंग पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विड्यांच्या वेष्टणावरील ८५ टक्के भागात सचित्र धोक्याचा इशारा दिल्यानंतर कंपनीचे नाव छापायचे कुठे? विड्यांचा ग्राहक प्रामुख्याने ग्रामीण भागातील आहे. उत्पादक कंपन्यांच्या संबोधचिन्हावरून तो विड्यांची मागणी करतो. तोच संभ्रमात पडला तर बाजारपेठ राहील का? दुसरीकडे या नियमाचे उल्लंघन केले तर दंड आणि कैदची तरतूद आहे.
अशा स्थितीत आम्ही उत्पादन करायचे तरी कशासाठी? पण कामगारांची उपासमारी आम्हालाही बघवत नाही. त्यांच्यासाठी तरी उद्योग चालवावाच लागेल. पण याबाबत २५ एप्रिललाच निर्णय होईल, असे महाराष्ट्र विडी उद्योग संघाचे अध्यक्ष सुधीर साबळे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
ऑल इंडिया विडी इंडस्ट्री फेडरेशनची दिल्लीत सोमवारपासून बैठक सुरू झाली. त्याचे सचिव म्हणून श्री. साबळे दिल्लीत ठाण मांडून आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत फेडरेशनचा निर्णय अपेक्षित होता. परंतु दोन दिवसांच्या चर्चेनंतर २५ एप्रिलपर्यंत थांबण्याचे ठरले. कारण त्याच िदवसापासून संसदेत दुसऱ्या सत्रातील अधिवेशन सुरू होत आहे. काही खासदार यासंबंधी सरकारला प्रश्न विचारणार आहेत.

या प्रश्नी गठित केलेल्या संसदीय सदस्य समितीचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी केंद्राला अहवाल दिला आहे. त्यात वेष्टणाच्या ५० टक्के भागावर सचित्र धोक्याचा इशारा छापण्याची शिफारस केली. निदान त्याचा तरी विचार होईल, असे देशभरातील विडी उद्योजकांना वाटते.

साबळे म्हणतात, कामगारांसाठीच..
प्रश्न: विडी उद्योग बंद असल्याने कामगार आत्महत्या करताहेत. त्यात दोघींचा मृत्यू झाला. हे कुठंवर चालणार? हाचप्रश्न शासनाला विचारतोय. सर्वोच्च न्यायालयात मांडतोय. उद्योग वाचला तरच कामगार वाचेल. सोलापूरच्या कामगारांचे काय हाल होताहेत, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण आमचा मूळ प्रश्न सुटला पाहिजे. शेवटी कामगारांचा तरी आम्हाला विचार करावाच लागेल. त्याबाबत २५ एप्रिललाच निर्णय होईल.

मी स्वत:ला संपवायला निघाले, ताईंनी रोखले
नवराअकाली गेला. विड्या बनवत जगताना गरज म्हणून बचत गटातून १५ हजार रुपये कर्ज घेतले. त्यानंतर कारखाने बंद झाले. कर्जाचा हप्ता कसा फेडायचा? वसुली करण्यासाठी आलेल्या माणसाला परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यावर तो हसला. इतर बायकाही माझ्यावर हसल्या. मला जिवंतपणीच मेल्यासारखे झाले. घरात जाऊन सडा मारण्याचे पिवळा रंग घेतले. तितक्यात काही महिलांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे नेले. त्यांनी मला पोतेभर तांदूळ, तेल, डाळ दिली. ‘मी आहे ना...’ असे बोलल्या. त्याने मी आत्महत्येचा विचार सोडला होता अशी माहिती माधवनगर येथील विडी कामगार चंद्रकला साका यांनी दिली.