आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया टाळणे, अन‌् स्वीकारणे अशक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ज्या मीडियाचा सामाजिक सहभाग असतो. त्याला सोशल मीडिया म्हणतात. अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा खूप वापर वाढला आहे. केवळ माहितीची देवाण-घेवाण नाही तर त्याच्या वापरातून चांगले पैसेदेखील कमावता येतात. सोशल मीडिया आपल्याला खूप काही देते मात्र विश्वासर्हता देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला बातम्यांसाठी वर्तमानपत्र, न्यूज चॅनलवर अवलंबून राहावे लागते. आता सोशल मीडिया आपल्याला पूर्णपणे टाळताही येत नाही आणि पूर्णपणे स्वीकारताही येत नसल्याचे मत दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी मांडले.

सोमवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिर येथे जनता बॅँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव व्याख्यानमालेत त्यांनी आपले विचार मांडले. सोशल मीडियाचा प्रभाव हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. चौथे पुष्प गुंफताना श्री. वानखेडे म्हणाले, सोशल मीडियामुळे पारंपरिक मीडियाचे काय होणार, याची चिंता अनेकाना लागून राहिली आहे. सोशल मीडियाचा जेवढा प्रसार वाढत आहे तेवढ्या प्रमाणात वर्तमानपत्रांचा खपही वाढत चाललेला आहे. नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला. त्यामुळे त्यांना चांगली मते पडून ते निवडून आले. तर दुसरीकडे देशाच्या सीमेवर पाकिस्तानाकडून झालेल्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाले. या वेळी कहा गया ५६ इंच का सीना म्हणून मोदींचा उपहासदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातूनच झाला. त्यामुळे सोशल मीडिया दुधारी तलवार असल्याचे जाणवते.

सोशल मीडिया बनला सामान्यांचा आवाज
सोशलमीडिया हा सामान्य व्यक्तींचा आवाज बनला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरणार्थी आपला जीव वाचवण्यासाठी सम्रुदामार्गे पलायन करित होते. या दरम्यान एका चिमुकल्याचा मृत्यू होतो. त्याचे शरीर लाटेवरून समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचतो. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की, युरोप खंडातील देशांना शरणार्थीसाठी आपले दरवाजे खुले करावे लागले. जे काम १० बैठका घेऊन होऊ शकले नसते ते काम एका फोटोने केले.

चपाती चळवळ सोशल मीडियाचे रूप
१८५७मध्ये ब्रिटिशाविरुद्ध लढा देण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावापर्यंत एक चपाती पाठवली जायची. एका चपातीच्या चार चपात्या करा असे सांगण्यात येत होते. ब्रिटिशांना हे नेमके काय चालले, हे समजत नव्हते. मात्र हा एक असंतोषाचा संदेश होता. सुरू झालेली चपाती चळवळ हे सोशल मीडियाचे एक रूप होते.

सोशल मीडियामुळे नेत्यांच्या बोलण्यात संयम
सोशलमीडियामुळे नेत्यांच्या बोलण्यात संयम आलेला आहे. सरकारकडून एखादी आकडेवारी प्रसिद्ध करताना आकडेवारीत कोणता गोंधळ होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येते. १४० शब्दांत ट्वीटरवरून संदेश कसे द्यायचे यासाठी अमेरिकेतील व्हाइट हाऊसमधून विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. चॅनल मॅनेज होतात त्याप्रमाणे सोशल मीडिया मॅनेज होऊ शकत नाही.