आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्र चोऱ्यांचे: नाकाबंदीतही दागिने हिसकावण्याच्या घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पोलिस दररोज पेट्रोलिंग, नाकाबंदी करतात तरीही चोऱ्यांचे प्रमाण आहेच. रविवारी एकाच दिवशी अंत्रोळीकरनगरात पंधरा तोळे, भय्या चौकात साडेसात तोळे सातरस्ता परिसरातील कृष्णा आइस्क्रीम दुकानासमोर दागिने हिसकावण्यात आले. तसेच शनिवारी कोंतम चौकात सिटी बसमध्ये एक तोळे दागिने पळवले. या सर्व घटना पाहता पोलिस नेमके पेट्रोलिंग नाकाबंदी करतात का? हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे.

नाकाबंदीत वाहनांची तपासणी होते. त्यातून काही चोरटे हाती लागतील, असे पोलिस म्हणतात. पण, गुन्हे शाखा, सातही ठाण्याचे डीबी पथक खबऱ्यांकडून माहिती काढून गुन्हेगारांचा शोध का घेत नाहीत. चोरांच्या मागावर राहणे गरजेचे आहे. पण, तसे काम होताना दिसत नाही. मागील सहा महिने ते वर्षभरापूर्वीचे अनेक गुन्हे उघडकीस आले नाहीत. सक्षमपणे पोलिसांची गस्त असते का? चोरींचा तपास आणि घटनांबाबात सहायक पोलिस आयुक्त शर्मिष्ठा घारगे यांना विचारले असता, आमचे नाकाबंदी, पेट्रोलिंग गस्त पथक, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरूच आहे. महिलांनीही दागिने घालून जाताना सावध असावे. सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात.

दोघा चोरांना अटक; तीन दुकाने फोडल्याची कबुली
गुन्हेशाखेच्या पोलिसांनी दोघा चोरांना अटक केली आहे. विनायक दत्तू नारबंडी (वय २०, रा. घोंगडेवस्ती, कालिका मंदिराच्या बोळात), विजय विकास बाबरे (वय २२, रा. अशोक चौक, बोल्ली मंगल कार्यालयाजवळ) यांना अटक झाली. फलटण गल्लीतील कापड दुकान, मंगळवारपेठेतील वाले साडी सेंटर गुरुवार पेठेतील आमरापूरकर ट्रेडर्स या दुकानात चोरी केल्याची कबुली दोघांनी दिली आहे. सुमारे ६२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. दोघांना पाणी टाकीजवळ अटक झाली. ही कारवाई सहायक आयुक्त घारगे, पोलिस निरीक्षक शंकर जिरगे, फौजदार गंगाधर जोगदनकर, चंद्रकांत दाते, मदन गायकवाड, निलकंठ तोटदार, संपत नारायणकर, राजेंद्र खारे, युसूफ काझी, विठ्ठल भोसले, उबाळे, अप्पासाहेब कोळी, धनाजी बाबर या पथकाने केली.

चोरीच्या तपासासाठी खास पथक पाहिजे. गुन्हे शाखेच्या पोलिसांना बंदोबस्त दिला जातो. त्यामुळे अनेकदा तपासाची दिशा बदलते. पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी पदभार घेताना गुन्हे तपासासाठी वेगळे पथक राहील असे म्हणाले होते. पण, तसे पथक अजून नेमले नाही.


अनेक गुन्ह्यांची उकल नाहीच
महावीरचौकातील एका डॉक्टरांच्या घरातून ६० तोळे, माजी महापौर भीमराव जाधव यांच्या घरातून ८० तोळे, प्रा. वजनम यांच्या घरातून ६० तोळे, बाळे-केगावजवळील एका शिक्षकाच्या घरावर दरोडा टाकून आठ तोळे दागिने नेले होते. रिक्षातून प्रवास करताना किनारा हॉटेलजवळ २५ तोळे दागिने पळवले होते. मागील दीडवर्षाचा आढावा घेतल्यास पन्नासहून अधीक चोऱ्यांमध्ये ४०० तोळ्यांहून अधिक दागिने चोरीला गेले आहेत. त्यांचा तपास नाही. फौजदार चावडीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी मंगळसूत्र चोरांची टोळी उघडकीस आणली होती. सुमारे तीस गुन्हे उघडकीस आणले सुमारे ४० तोळे दागिने जप्त केले होते. त्यानंतर मोठा गुन्हा उघडकीस आला नाही.

भय्या चौकात मोबाइल पळवला
भय्याचौकात बसस्टॉपवर लतिफ मुजावर (रा. मंगळवेढा) यांचा मोबाइल पळवताना एकाला पकडले. सतीश कट्टीमनी (वय २६, रा. गदग, कर्नाटक) याला अटक झाली. रविवारी सायंकाळी पाचला हा प्रकार घडला होता. दुसऱ्या घटनेत शिवगंगानगर भाग एक जुळे सोलापूर येथे राहणारे बिरप्पा दुधभाते यांच्या घरातून दोन मोबाइल चोरांनी नेले. रविवारी रात्री सातला ही घटना घडली. दुधभाते यांचे घर उघडे होते. त्यावेळी चोरांनी मोबाइल नेल्याची फिर्याद विजापूर नाका पोलिसांत देण्यात आली आहे. तिसऱ्या घटनेत दीड लाख किमतीच्या ताब्यांच्या तारा चोरीस गेल्या. मडकीवस्ती येथील वीजवितरण कंपनीच्या डीपीमधून चोरांनी वायर नेल्याची फिर्याद शिवशंकर ढेपे यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली आहे.