आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या रथयात्रेत वारकरी चिंब न्हाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यामधील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री विठ्ठल, राही आणि रखुमाईच्या मूर्तींची शहरातून निघणारी रथयात्रा होय. माहेश्वरी धर्मशाळेपासून शुक्रवारी दुपारी रथयात्रेस उत्साहात सुरुवात झाली. या वेळी शेकडो वारकरी रथावरती खारीक, बत्तासे उधळून मनोभावे श्री विठ्ठलाचे दर्शन घेत होते. वर्षातील चार प्रमुख यात्रांपैकी फक्त आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या वेळीच श्री विठ्ठलाची रथयात्रा काढण्यात येते.
रथावर येथील देवधर, रानडे आणि नातू यांना बसण्याचा मान आहे. हा रथ ओढण्याचा मान येथील वडार समाजातील बांधवांना आहे. त्यांच्या बरोबर वारकरी भाविकदेखील पुण्याचे काम म्हणून मोठ्या श्रद्धेने हा रथ ओढण्याचे काम करीत असतात. दरम्यान, सकाळी एकादशीच्या निमित्ताने येथील खासगीवाले धर्मशाळेमध्ये असलेल्या श्री विठ्ठल, राही आणि रखुमाई यांच्या मूर्तींची विधिवत पूजा करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने दुपारी श्री विठ्ठलाची मूर्ती मध्यभागी आणि त्याच्या एका बाजूला राही व दुसऱ्या बाजूला रखुमाईच्या मूर्ती झेंडू, अष्टूर आदी फुलांनी सजविलेल्या रथामध्ये ठेवण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा विधिवत पूजा आणि आरती होऊन रथयात्रेस प्रारंभ करण्यात आला. रथयात्रेच्या दर्शनासाठी येथील प्रदक्षिणा रस्त्यावर वारकरी तसेच स्थानिक नागरिकांनी दुर्तफा मोठी गर्दी केलेली होती. या मार्गावरील घरांच्या गच्चीवरून रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी दिसत होती.
बातम्या आणखी आहेत...