आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूरात संत विद्यापीठ उभारणार- एकनाथ खडसेंची \'कार्तिकी\'त ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- पंढरपूरनगरी ही आपली आध्यत्मिक राजधानी आहे. संतांच्या विचारांचा ठेवा व संस्कार येथे आहे. तो पुढील पिढी पर्यंत गेला पाहिजे त्यासाठी पंढरपुरात संत विद्यापीठ उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. राज्यात सतत पडत असलेला दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे नुकसान या संकटापासून राज्यातील जनेतला मुक्त कर, जनता सुखी समाधानी होऊ दे असे साकडेही खडसेंनी विठूरायांकडे घातले. कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा महसूलमंत्री खडसे यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. या पूजेनंतर आयोजित केलेल्या सत्कार समारंभात खडसे बोलत होते. महापूजेच्या वेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान यंदा नाशकातील मालेगाव तालुक्‍यातील जादूवाडी येथील वारकरी दामोदर रतन सोमासे (वय 85) व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई सोमासे (वय 78) यांना मिळाला.
विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल ।। विठ्ठल सुखा विठ्ठल दु:खा तुक्या मुखा विठ्ठल ।। या संतवचनाप्रमाणे कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याचे 3-4 लाखाच्या आसपास भाविक साक्षीदार झाले. कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सपत्नीक केली. गेल्या वर्षीच्या कार्तिकी यात्रेच्या तुलनेत यावर्षी दुष्काळी परिस्थिती, महागाई, एसटीची भाडेवाढ आदी विविध कारणांमुळे भाविकांची संख्या मात्र रोडावल्याचे दिसत आहे.
कार्तिकी एकादशीचा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधूनही रेल्वे, एसटी खासगी वाहनांनी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक शनिवारी दाखल झाले होते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आणि विठुनामाच्या जयघोषामुळे पुण्यनगरी पंढरी भक्तिरसात चिंब झाली. शहरातील मठ, धर्मशाळा, वाडे चंद्रभागेच्या विस्तीर्ण वाळवंटात भजन, कीर्तन आणि प्रवचनात भाविक दंग होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग शहरातील अन्य रस्त्यांसह प्रमुख असलेल्या स्टेशन रस्त्यावर प्रासादिक वस्तू, आणि दुकाने सजली होती. सोलापूरी चादरी, घोंगडी, फोटो फ्रेम, देवदेवतांच्या मूर्ती अशा दुकानांमध्ये भाविकांची गर्दी दिसत आहे.
मंदिर समितीने पदस्पर्श दर्शनासह मुखदर्शनाचीही चांगली व्यवस्था केली होती. श्री विठ्ठल मूर्तीपासून अवघ्या चाळीस फूटावरुन एका वेळेस साधारण चार ते पाच भाविकांना श्री विठुरायाचे मुखदर्शन घडत होते. यात्रेच्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शहरातील चंद्रभागा वाळवंट, 65 एकर परिसर, मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, दर्शन मंडप, गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड आदी विविध ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.