आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेर कटारे मिलचा भोंगा बंद; दीड हजार कामगारांची उपासमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामलवाडी - तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरातील अनेक कुटुंबांचा आधार असलेली येथील कटारे स्पिनिंग मिल महिन्यापासून बंद पडली आहे. यामुळे सुमारे १५०० कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कापसाचे भाव गगनाला भिडल्यामुळे ही कंपनी बंद करण्यात आली आहे.
तामलवाडी पंचक्रोशीत वरदायिनी ठरलेल्या कटारे स्पिनिंग मिलला सध्या घरघर लागल्याची परिस्थिती आहे. मराठवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी म्हणजेच तामलवाडीजवळ ३५ वर्षांपूर्वी कटारे स्पिनिंग मिलची सोलापूरच्या कटारे उद्योग समूहाने स्थापना केली होती. सुरुवातीच्या कालावधीमध्ये या कटारे स्पिनिंग मिलमध्ये तीन शिप्टमध्ये एक हजार ५०० हजार कामगार काम करत होते. त्यामुळे या परिसरात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढली होती. अनेकांच्या हाताला काम मिळाल्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक दूरवरच्या गावातील लोकही कामासाठी तामलवाडी परिसरात येऊन स्थायिक झाले हाेते. मात्र, आता सर्व परिस्थितीमध्ये बदल होत आहे. कंपनीचे पूर्वीचे वैभव राहिलेले नाही.
कंपनीलापाच - सहा वर्षांपासून घरघर सुरू झाली आहे.
कंपनीचाउद्योग आतबट्ट्याचा होत असल्यामुळे पाच-सहा वर्षापासून कटारे स्पिनिंग मिलला उतरती कळा लागत चालली आहे. तेव्हा पासून टप्प्याने कंपनीने एक एक विभाग बंद करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यात सुतगिरणीमध्ये केवळ ३०० कामगार उरले. १२०० कामगार यापूर्वीच बेरोजगार झाले आहेत. आता तर एक महिन्यापासून पूर्णपणे मिल बंद करण्यात आली आहे. यामुळे उर्वरित ३०० कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सध्या खरीप हंगामातील सुगीचे दिवस असल्यामुळे कामगारांना तात्पुरते काम मिळाले आहे. मात्र, सुगीचे दिवस संपल्यानंतर कामगारांवर पुन्हा उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे कटारे समूहाने ही गिरणी पूर्ववत सुरू करण्याकडे कामगारांचे डोळे लागले आहेत.
यामुळे बंद झाली कंपनी :कापसाचे भाव वाढल्यामुळे तसेच कापूस वेळेवर मिळत नसल्यामुळे सुताचे उत्पन्न निघणे कठीण झाले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कापसाचा दर ४८ हजार रुपये प्रतिटन झाल्यामुळे कंपनी तोट्यात सुरू होती. कापूस खरेदी केलेल्या किंमतीइतकाही दर सुताला मिळत नव्हता. यामुळे उत्पादन खर्च अधिक उत्पन्न कमी अशी कंपनीची परिस्थिती झाली. यामुळे कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील मराठवाड्यासह काही भागात दुष्काळी परिस्थिती आणि त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने यावर्षीही कापसाची उत्पादकता कमालीची घटली आहे.त्याचा परिणाम थेट मिलवर होऊ लागला आहे. राज्यातील अनेक भागातील खासगी तत्त्वावरील सूत मिल अलीकडच्या काळात बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे कामगारांच्या कुटंुबाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्वच उद्योग अडचणीत
गेल्यावर्षीदुष्काळामुळे उत्पादनात मोठी घट निर्माण झाली होती. या वर्षीही अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी सुतगिरणी उद्योग अडचणीत सापडला आहे. शासनाने याकडे लक्ष घालून सूतगिरण्यांना गत वैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे.
..तरच कंपनी सुरू करू
^गेल्यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे कापसाच्या उत्पन्नात घट झाली. त्यामुळे उपलब्ध कापसाचे दर भरमसाट वाढले आहेत. कापसाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्यातील ७० टक्के सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. दिवाळीनंतर मार्केटमध्ये नवीन कापूस आला तरच आम्ही कंपनी पुन्हा सुरू करण्याचा विचार करण्यात येईल. -किशोर कटारे, मालक, कटारे उद्योगसमूह.
^गेल्यामहिन्यापासूनसूतगिरणी बंद असल्यामुळे कामगारांची आर्थिक फरपट होत आहे. कापूस महागल्यामुळे मालकांनी तात्पुरती सूतगिरणी बंद केली आहे. दिवाळीनंतर पुन्हा सुतगिरणी सुरू करणार असल्याचे अाश्वासन मालकांनी युनियनला दिले आहे. -शाहीरगायकवाड, अध्यक्ष, कामगार संघटना.
भोंगा झाला बंद
परिसरातील नागरिकांना मिलच्या भोंग्याची चांगलीच सवय झाली होती. आपल्या दिवसाचे टाइमटेबलही भोंग्यावरून समजत होते. हातातील घड्याळाऐवजी नागरिकांचे भोंग्याकडे लक्ष असायचे. मिलचा भोंगा बंद झाल्यामुळे चुकल्यासारखे वाटत आहे.
बातम्या आणखी आहेत...