आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेचिंग क्लासेसच्या शिक्षकाचे अपहरण; सात तासांनी सोडले; बार्शीतील प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी- मॉर्निंग वॉकला चाललेल्या येथील खासगी शिकवणीचालकाचे गुरुवारी सकाळी सहा वाजता बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावरील गौरी हॉटेलसमोरून अपहरण करण्यात अाले. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सात तासांतच अपहृत शिक्षकांनीच नातेवाइकांना फोन करून आपण सुखरूप असल्याचे कळवले. पैशाची मागणी करून व धमकी देऊन वाकडी (ता. परंडा) जवळील रस्त्यावर त्यांना सोडून देण्यात आले.  
 
मधुकर गणपत डोईफोडे (४९, रा. पाटील प्लॉट, शिवाजीनगर, बार्शी) असे अपहृत शिक्षकाचे नाव आहे. डोईफोडे हे बार्शीत रवी क्लासेस चालवतात. गुरुवारी  डोईफोडे नेहमीप्रमाणे घरातून मॉर्निंग वाॅकला निघाले होते. सकाळी ६ च्या सुमारास बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावरील हॉटेल गौरीसमोरून जात असताना याठिकाणी विनाक्रमांकाची पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी आली. त्यातून  चार-पाच जण उतरले. त्यांनी बळजबरीने डोईफोडे यांना गाडीत बसवले. त्यांनी आरडाओरड केली, मात्र अपहरणकर्त्यांनी गाडी लगेच दामटली. दरम्यान, काही जणांनी खांडवी येथील मित्रांना फोन करून पांढऱ्या रंगाची संशयित स्कॉर्पिओ गाडी अडवण्यास सांगितले. तेथील लोकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्नही केला, मात्र यशस्वी झाला नाही. दरम्यान, डोईफोडे यांची पत्नी आणि नातेवाइकांनी पोलिसांत जाऊन फिर्याद दिली.  त्यानंतर पाेलिसांनी तातडीने तपास कार्य सुरू केले. मात्र सातच तासाच डोईफोडे स्वत:हून घरी अाले.

एक कोटीची मागणी  
आरोपींनी डोईफोडे यांना गाडीत घातल्यानंतर त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात आली. मारहाण करत एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. शिवाय पोलिसांना सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. काही अंतरावर गाडी थांबवून नंबरप्लेट बसवण्यात आली. जवळपास ७ तास डोईफोडे यांना कच्च्या रस्त्याने फिरवण्यात आले. नंतर अपहरण करणाऱ्यांना एक फोन आला. त्यानंतर पुन्हा गाडीची नंबरप्लेट काढण्यात आली. वाकडीजवळ डोईफोडे यांना आरोपीने स्वत:ची चप्पलही दिली व रस्त्यात सोडून ते निघून गेल्याचे डोईफोडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...