आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पष्ट ध्येय ठेवा, मन साफ करा; प्रत्येक अडचण सोडवू शकाल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ध्येय स्पष्ट ठेवा, मन साफ करा, नेतृत्वगुण विकसित करा. त्याने येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा सामना करू शकाल. जो अडचणी सोडवतो, त्याला साहजिकच मान मिळतो अन् जो नुसत्याच अडचणी सांगत असतो, त्याच्याकडे लोक दुर्लक्ष करतात. कुठल्याही गोष्टीसाठी रागाराग करू नका. प्रत्येक गोष्ट समजून घ्या. त्याने अडचणी सोडवण्यात मोठी मदत होते, हा मंत्र सांगितला ख्यातनाम व्यवस्थापन गुरू एन. रघुरामन यांनी.

‘दिव्य मराठी नॉलेज सिरिज’ अंतर्गत रविवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात त्यांचे व्याख्यान झाले. ‘जाणून घ्या मॅनेजमेंट फंडे’ या विषयावर ते बोलले. त्यांना ऐकण्यासाठी सभागृह खचाखच भरलेला होता. मार्मिक फंडे ऐकताना प्रचंड टाळ्या दिल्या. हंशाही पिकला. छोट्या छोट्या उदाहरणांनी, माहितीपटाने आणि कथा सांगत श्री. रघुरामन यांनी जगण्यातली मौज विशद केली. कुठल्याही गोष्टीची निवड, त्याचे अखेरचे साध्य या गोष्टी स्पष्ट करून घ्या. त्याच्या मार्गात निश्चित अडचणी येतील. पण त्याच्याशी तडजोड करू नका. अडचणी स्वीकारा. त्याचा सामना करा, उपाय शोधा. निश्चित पुढे जाल, असेही ते म्हणाले.

कल्पना चावलाची गोष्ट
अंतराळवीर कल्पना चावलाच्या मुलाखतीसाठी श्री. रघुरामन कॅलिफोर्नियात गेले. ठरलेल्या वेळेत ती आली नाही. उशिराचे कारण देताना, तिने चप्पल तुटल्याचे सांगितले. त्यावर कपाळावर हात मारत तिचे वडील म्हणाले, 'शिवणाऱ्याला किती पैसे दिले? कल्पना म्हणाली, ‘१२ डॉलर.’ ‘अगं १० डॉलरमध्ये नवीन चप्पल आले असते की...’ वडलांचा राग. त्यावर कल्पना शांतपणे म्हणाली, ‘हो. पण त्यासाठी आणखी एक प्राणी मारला गेला असता. त्यापेक्षा १२ डॉलरने त्या शिवणाऱ्याचे एक दिवसाचे भागले. ते महत्त्वाचे...’ तिच्या जगण्यातला हा किस्सा मला खूप सांगून गेल्याचे श्री. रघुराम म्हणाले.

स्पष्टवक्ती वहिदा रहेमान
एका तेलुगु चित्रपटात १७ वर्षीय मुलीने सुंदर नृत्य केले. ते पाहण्यासाठी चित्रपटाला मोठी गर्दी होती. गुरुदत्त यांनी ते ऐकले. त्यांच्या सहाय्यकाला त्या मुलीला बोलावण्याचे फर्मान सोडले. हैदराबादहून ती आली. तिची मुलाखत झाली. त्यानंतर एका चित्रपटासाठी गुरुदत्तने तिला घेतल्याचे सांगत, करारपत्र पुढे केले. त्यावर सही करण्यापूर्वी तिने वाचणार असल्याचे सांगितले. शिवाय हे करारपत्र आईच्या नावाने हवे. मी तर १७ वर्षांची आहे. माझ्याशी करार करता येणार नाही, असे तिने स्पष्ट केले. करारपत्र वाचल्यानंतर तिने एक अट घातली. तिला शोभणारी वस्त्रे घालणार नाही. ती अमान्य करताना गुरुदत्त म्हणाले, ‘त्याचा अधिकार तुला नाही.’ तिने नकार देत, हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या स्पष्टवक्तेपणावर आनंदित होत गुरुदत्तने चित्रपट बनवला. सीआयडी. त्यात होती तीच मुलगी वहिदा रहेमान. या गोष्टीवर प्रचंड टाळ्या.