आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूत्रपिंड देऊन आप्तांचा जीव वाचवण्यात महिलावर्गच ..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मूत्रपिंड निकामी झाले की ते बदलणे हाच सध्या एकमेव मार्ग आहे. मात्र, त्यासाठी मूत्रपिंड दाते सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनाच पुढे यावे लागते. हा त्याग दाखवण्यात महिला पुढे आहेत. अवयव दानाची चळवळ येथे अजून तितकीशी रुजलेली नाही.
मृत व्यक्तीच्या अवयव दानाचे प्रमाण नगण्य आहे. त्याचे विविध अवयव दान केल्यास किमान नऊ जणांना दुसरे जीवन मिळू शकते. परंतु लोकांमध्ये जागृती नसल्याने याकडे कल नाही. अवयव दानापेक्षा मरणोत्तर डोळे दान करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्याबाबत नाही म्हटले तरी बरेच प्रबोधन झाले आहे. समाजात त्याला मान्यताही मिळत आहे. मात्र, मृताचे अवयव काढण्यास नातेवाईक धजावत नाहीत.

यांनी दिले मूत्रपिंड
काहीकारणांमुळे मूत्रपिंड निकामी झाल्यास डायलेसिस करावे लागते. मात्र, यामुळे रुग्णाचे जीवन सामान्य होत नाही. हे दीर्घकाळ चालूही शकत नाही. यात एकमेव पर्याय मूत्रपिंड बदलणे आहे. सोलापुरात मूत्रपिंड दान करणाऱ्यांत पाच पत्नी, पाच आई तर एका भावजयीचा समावेश आहे. जयमाला अय्यर, शीतल ठाकूर, सुवर्णा तानवडे, छाया सुतार, डॉ. प्रीती शिर्के, उज्ज्वला ठोंबरे, जुबेदा अत्तार, डॉ. मंजुषा भानवसे, पद्मावती कुलकर्णी, अश्विनी बावस्कर अंजना होनमाने यांनी मूत्रपिंड देऊन हा पर्याय रुग्णांना दिला.

वहिनीने वाचवले दीराला
वहिनीनेमूत्रपिंड देऊन ३५ वर्षीय तरुणाचा जीव वाचविला आहे. ही घटना माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावातील शेतकरी कुटुंबातील आहे. रघू होनमाने याचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले. दोन वर्षे डायलेसिसवर काढण्यात आली. घरातील आई, वडील, भाऊ, बहीण यांचे रक्त जुळत नसल्याने रुग्णास मूत्रपिंड कोण देणार? हा प्रश्न होता. वहिनी अंजना होनमाने यांचा रक्तगट जुळला. त्यांनी होकारही दिला. २५ ऑगस्ट २०१५ रोजी मूत्रपिंड बदलण्याची शस्त्रक्रिया झाली. आता दीर आणि वहिनी दोघांची प्रकृती ठणठणीत आहे.

मृत्यूनंतर पाच जणांना जीवनदान
विज्ञानाचे शिक्षक म्हणून येथे ख्यात असलेल्या प्राचार्य डॉ. नागेश धायगुडे यांनी मरणानंतर इतर पाच जणांना जीवनदान दिले. त्यांचे दोन डोळे, दोन मूत्रपिंड आणि यकृत असे पाच अवयव पाच रुग्णांना देण्यात आले. अन्य अवयवही दान करायचे होते. मात्र, त्यांचे गरजू रुग्ण आढळले नाहीत. मेंदू मृत झाल्यानंतर अवयवदान करण्याची ही सोलापुरातील एकमेव घटना आहे. ही कामगिरी पत्नी प्रा. वैशाली धायगुडे यांनी पार पाडली.

समाजात मरणोत्तर अवयवदान रुजण्यासाठी प्रबोधन हवे
मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या तुलनेत दानशूर अत्यल्प आहेत. जिवंत लोकांनी मूत्रपिंड देण्याचे प्रमाण सोलापुरात जास्त आहे. प्रबोधन मोहीम सुरू करणे गरजेचे आहे. मोठ्या शहरांप्रमाणे सोलापुरात मेंदूमृत (ब्रेनडेड) झालेल्यांचे अवयव दान केले जात नाही. बऱ्याच अपघातात रुग्ण ब्रेनडेड होतात. त्यांचे अवयव दान केल्यास किमान नऊ जणांना नवे जीवन मिळू शकते. लोकांनी, विशेषत: नातेवाईकांनी हे लक्षात घेतले पाहिजे.” डॉ. संदीप होळकर, मूत्रपिंडविकार तज्ज्ञ

हे अवयव करता येतात दान
डॉक्टरांनी मेंदू मृत जाहीर केल्यानंतर नऊ अवयव दान करता येतात. मृताचे दोन डोळे, दोन मूत्रपिंड, हृदय, यकृत, स्वादूपिंड, आतडे तसेच त्वचा, बोनमॅरो अन्य वेगवेगळ्या रुग्णांना वापरता येऊ शकतात. तर जिवंतपणीही अवयव दान करता येतात. त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होत नाही. यात दोनपैकी एक मूत्रपिंड, यकृतचा काही भाग आणि बोनमॅरो देता येतो.