आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले योजनेतून किडनी प्रत्यारोपण; तीन लाख रुपयांपर्यंतचा खर्च मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणाचा खर्च हा सामान्यांच्या आवाक्यातील नाही. त्यामुळे राज्य शासनाने ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून सामान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली. तीन लाख रुपयांचा उपचार या योजनेतून मिळेल. यात दात्याच्या शस्त्रक्रियेचाही समावेश करण्यात आला आहे.

२ ऑक्टोबरला फुले यांच्या १२५ व्या स्मतिदिनापासून ही योजना राज्यात लागू होईल. राजीव गांधी जीवनदायी योजना १ ऑक्टोबरला संपुष्टात येईल. योजनेचे नाव बदलून शासनाने खर्चाची व्याप्ती वाढवली आहे. सध्याच्या राजीव गांधी योजनेत प्रति कुटुंब, माणशी दीड लाख रुपये उपचार खर्चाची मर्यादा आहे. त्यात ५० हजारांची वाढ करण्यात आली. शिवाय कर्करोग, बालक आणि वृद्धांवरील उपचार, सिकलसेल, अॅनिमिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू यांचा समावेश करण्यात आला आहे. ३१ सेवांतर्गत ११०० उपचार प्रकारांचा समावेश यात करण्यात आला.

२० खाटांचे रुग्णालय योजनेत येऊ शकणार : योजनेत रुग्णालयांना अंगीकृत करून घेण्याच्या निकषांमध्येही लवचिकता आणली आहे. नव्या योजनेनुसार किमान २० खाटांची मर्यादा राहील. त्यामुळे तज्ज्ञांच्या छोट्या रुग्णालयांमध्येही या योजनेतून सेवा मिळेल. काही प्रमुख शहरांतून त्यासाठी प्रस्ताव पाठवले गेले आहेत.

बीपीएल, १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ
दारिद्र्य रेषेखालील पिवळ्या शिधापत्रिकाधारक, अंत्योदय अन्न योजना-अन्नपूर्णा योजना शिधापत्रिकाधारक, दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक, १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे, आश्रमशाळेतील विद्यार्थी, महिलाश्रमातील महिला, अनाथालयातील मुले आणि वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि त्यांच्यावर विसंबून असणारे कुटुंब सदस्य.
बातम्या आणखी आहेत...