आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या टँकरची धडक; दोघे ठार, गांधी नगर चौकातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत अस्लम शेख - Divya Marathi
मृत अस्लम शेख
सोलापूर - खासगी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरने दिलेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलवरच्या दोघांचा मृत्यू झाला. जुना अक्कलकोट नाका येथे मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मृत दोघांपैकी एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. या घटनेनंतर शहरातील अवैध खासगी पाणीपुरवठ्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीतून अनेकांचे बळी गेलेले आहेत.
अस्लम नूरअहमद शेख (वय ३२, रा. गोदूताई विडी घरकुल) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्यांच्या पाठीमागे बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. शेख हे मंगळवारी आपले काम संपवून अापल्या मोटारसायकलवर(एमएच १३, सीए ७०७८) घरी जात होते. त्याच्यासोबत पन्नास वर्षीय व्यक्ती होती. जुना अक्कलकोट नाका येथे आल्यानंतर शहराकडे वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टॅँकर(एम एच १३, बी ७०१)ने मोटारसायकलला जोरात धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून चाक गेल्याने त्यांची ओळख पटली नाही. ही व्यक्ती साधारण ५० वयाची आहे. ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत. टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे.

अन् घर झाले पोरके
मृत अस्लम हे सुतार काम करत होते. तुळजापूर वेस येथे काम करत होते. गेल्या दीड वर्षापासून ते कुंभारी येथील गोदुताई विडी घरकुल येथे वास्तव्यास होते. अस्लमची आई विडी कामगार आहेत. अस्लम यांना तीन मुली आहेत. एक चार वर्षाची, दुसरी अडीच तर तिसरी एक वर्षाची आहे. घरात तेच कर्ता माणूस होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे घर पोरके झाले. अस्लमा यांच्या मृत्यूची बातमी समजाच आई आणि पत्नीला शोक अनावर झाला.

वाहन परवान्याची चौकशी व्हावी
अक्कलकोट रोड परिसरात खासगी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची कायम वर्दळ असते. या खासगी टॅँकरना शासनाची मंजुरी आहे का, टॅँकर मालक, टॅँकरचे सर्व कागदपत्रे , वाहन परवाना महापालिका, आरटीओची परवानगी आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. यापूर्वीही असे अपघात झाले आहेत.