आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई राजा उदो...उदोचा जयघोष; तुळजापुरात दोन लाख भाविक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - श्रीतुळजाभवानी मातेच्या अश्विन पौर्णिमा सोहळ्यात सहभागी होऊन देवीचरणी पायी वारी पूर्ण करण्यासाठी शनिवारी(दि. १५) सायंकाळपर्यंत सुमारे दोन लाख भाविकांनी तीर्थक्षेत्र तुळजापुरात हजेरी लावली.
यावेळी तीर्थक्षेत्र तुळजापूर आई राजा उदो..उदो, सदानंदीचा उदो..उदोच्या जयघोषाने दणाणले. पायी चालत येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी दानशूर मंडळी, राजकीय पक्ष, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी देवीभक्तांसाठी भोजन, नाष्टा, चहाची व्यवस्था केली. भाविकांचा ओघ रविवार दुपारपर्यत वाढणारअसून सुमारे १० ते १२ लाख भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी केली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात सर्वच मार्गावरून भाविकांचे जथ्थे दाखल होत असून यामध्ये महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील भाविकांचा समावेश आहे.

पहाटेदेवी सिंहासनावर विराजमान :मंगळवारी (दि. ११) विजयादशमीदिनी उषःकाली सीमोल्लंघनानंतर निद्रिस्त झालेली श्री तुळजाभवानीची मूर्ती रविवारी (दि.१६) पहाटे देवीजींच्या चांदीच्या सिंहासनावर अधिष्ठित करण्यात येणार आहे. रात्री सोलापूरच्या मानाच्या शिवलाड समाजाच्या काठ्यांसह मंदिर प्रांगणात छबिना काढण्यात येणार आहे. त्यानंतर शारदीय नवरात्रोत्सव सोहळ्याचा समारोप होणार आहे.

काळे कुटुंबीयांकडून दहा वर्षांपासून अन्नछत्राची सेवा
देवीच्या दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भक्तांसाठी मुळचे तुळजापूर येथील रहिवाशी सध्या मुंबई येथे केटरिंग व्यवसायामध्ये प्रसिद्ध असलेले चंद्रकांत काळे यांच्या वतीने मोफत अन्नछत्र शुक्रवारी रात्री सुरू करण्यात आले होते. मागील १० वर्षापासून घाटशीळ पायथ्याशी ते अन्नछत्र चालवितात. या अन्नछत्रात पंचतारांकित हाॅटेलप्रमाणे दर्जेदार अन्न देविभक्तांना देण्यात येते.
तीर्थक्षेत्रात तुळजापुरात राज्यासह परराज्यांतून भाविकांचे जथ्थे दाखल होत आहेत. संपूर्ण शहरात भक्तांचा जनसागर लोटला आहे.

सिंधी समाजाच्या वतीने भाविकांच्या तळव्यांची मसाज
तामलवाडी येथील किसान इरिगेटर्स या कंपनीच्या समोर सोलापूर येथील सिंधी समाजाच्या वतीने मोफत नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच चालून थकलेल्या भाविकांच्या पायांच्या तळव्यांची मसाज करून त्यांचा थकवा घालवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाविकांसाठी विश्रांतीचीही व्यवस्था केली होती. तामलवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी पाण्याचे पाऊच देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...