आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिसिंहांनी रानमसले परिषदेतून उभी केली होती एकजूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर सोलापूर : रानमसले येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भाववाढ विरोधी परिषद घेतली होती. त्याला बुधवारी (दि. २९) ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. काँग्रेसच्या राजवटीत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक, वाढती महागाई, अन्नधान्याची कृत्रिम टंचाई, व्यापाऱ्यांची नफेखोरी यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांची लूट होत होती. रानमसलेमध्ये भाववाढविरोधी परिषदेचे आयोजन करून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी याविरोधात शेतकरी, सामान्यांची एकजूट उभी केली होती, अशी आठवण इतिहासाचे अभ्यासक माजी प्राचार्य उद्धव गरड यांनी सांगितली.
२९ जुलै १९६६ रोजी आयोजित या परिषदेचे नियोजन स्वातंत्र्य सैनिक धर्मराज नारायण गरड यांच्याकडे होते. ते क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेल्या तुफान सेनेत सक्रिय होते. त्यांचा हैदराबाद मुक्ती संग्रामातही सक्रिय सहभाग होता, असे सांगून प्राचार्य गरड म्हणाले, त्यावेळी शेतीधंदा तोट्यात होता. शेतीत भांडवल निर्मिती होत नव्हती. खत, पाण्याचा अभाव हे शेती उत्पादन वाढण्यामागचे कारण होते. तत्कालीन काँग्रेस सरकार याकडे कानाडोळा करत होते. याविरोधात शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी ही परिषद आयोजिली होती. या परिषदेला तत्कालीन सरपंच काशिनाथ पंढरीनाथ गरड, विठ्ठल गरड (मिस्त्री), स्वातंत्र्यसैनिक पंडित चौगुले (नान्नज), यादवराव थिटे, भाई सगर (पंढरपूर), भाई धोंडिबा शितोळे, भाई दादासाहेब पवार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांत जागृती घडवली
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांत जागृती घडवली. रानमसले गावात त्यांच्या स्मृती जपायला हव्यात. गावातील एखाद्या रस्त्याला अथवा चौकाला त्यांचे नाव देण्याचा प्रयत्न व्हायला हवा.'' उद्धव गरड, माजी प्राचार्य
जो कष्ट करतो त्याचा गौरव...
या परिषदेला क्रांतिसिंह नाना पाटील हे वडाळ्याहून बैलगाडीने क्रांतिसिंह रानमसलेकडे येत होते. तेव्हा बैलगाडी चिखलात रुतली. बैलांना गाडी ओढणे अशक्य झाल्याने त्यासाठी रेड्यांना पाचारण केले. रेड्यांनी चिखलात रुतलेली गाडी ओढून काढली. त्यावर क्रांतिसिंह नाना पाटील म्हणाले, जो कष्ट करतो त्याचा गौरव करा. त्यानुसार त्यांची रेड्यांच्या गाडीतून मिरवणूक काढण्यात आली.