आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पोलिसांनी दिली बाळाला मायेची सावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नवऱ्यासोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात विषारी द्रव्य पिले आणि चिमुकल्याला कडेवर घेऊन एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तिला रिक्षात बसवून सिव्हिलमध्ये आणले. उपचार सुरू होऊन अवघ्या दहा मिनिटांत तिचा मृत्यू झाला. काय घडत आहे हे समजण्याचे वय नसलेला चिमुकला सतत आ...ई, आ...ई अशी हाक देत रडताना पाहून सिव्हिलमधील अनेकांचे डोळे पाणावले. स्नेहा अर्जुन शिंदे (वय २२, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर १, लिमयेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.

कडेवर वर्षाचे बाळ (वेदांत) घेऊन स्नेहा मंगळवारी दुपारी एमआयडीसी चौकीत पोहोचली. रात्री नवऱ्यासोबत झालेल्या भांडणामुळे पिवळ्या रंगाचे विषारी द्रव्य पिल्याचे तिने सांगितले. उपनिरीक्षक श्वेताली सुतार यांनी तिला मुलासह सिव्हिलला पाठवले. सोबत नाईकवाडी या पोलिस कर्मचाऱ्यास पाठवले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर चिमुकल्याने टाहो फोडला. बाळाला सांभाळण्यासाठी पोलिस चौकीतून वृषाली कनेरे या आल्या. कनेरे यांनी त्या मुलाला मायेने जवळ घेतले. बिस्किट खाण्यास दिले आणि त्याला मांडीवर झोपवले.

नातेवाइक आले नाही
स्नेहा शिंदे ही आपल्या पतीसह सूत मिलच्या मागे भाड्याच्या घरात रहात आहे. पोलिसांनी तिच्या पतीसह नातेवाइकांचा शोध घेतला. सायंकाळपर्यंत एकही नातेवाइक आला नाही. पती रात्री आठ वाजता कामावरून परत येतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. रात्रीपर्यंत चिमुकला वेदांत सिव्हिल पोलिस चौकीतच होता.