आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Large Organizations Election Preparation In Solapur

शहरातील मोठ्या संस्थांच्या निवडणुकीची जय्यत तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हामध्यवर्ती आणि सिद्धेश्वर बँकेसोबतच मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाची निवडणूक प्रक्रिया आता सुरू झाली आहे. तिन्ही संस्थांच्या निवडणुका डिसेंबरअखेर पूर्ण होतील. त्यामुळे पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा फटाके वाजणार आहेत. तिन्ही संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. सहकार खात्यानेही जय्यत तयारी केली. जिल्हा बँकेचा निकाल २२ डिसेंबरला तर सिद्धेश्वर बँकेचा निकाल २९ डिसेंबरला जाहीर होईल. मार्कंडेय रुग्णालयाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्यांचे काम सुरू अाहे. लवकरच त्याचाही कार्यक्रम जाहीर होईल.
लक्षजिल्हा बँके कडेच
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची कारवाई सुरू असतानाच निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी मिळाली. १९ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. तत्पूर्वी १६ नोव्हेंबरला बरखास्त करण्याच्या कारवाईवर शिक्कामोर्तबही केले जाणार आहे. बरखास्त झाल्यास विद्यमान संचालक मंडळ निवडणुकीसाठी पात्र ठरणार नाही. सहकार खात्याने तशी कारवाई केली नाही तर न्यायालयाचा अवमान होईल. या स्थितीमुळे जिल्हा बँकेकडेच लक्ष लागले आहे. दुसरीकडे निवडणुकीचा कार्यक्रम मात्र सुरूच राहील. २४ नोव्हेंबरला छाननी, १० डिसेंबरपर्यंत माघार आणि २१ डिसेंबरला मतदान, त्याच्या दुसऱ्या दिवशी निकाल असा हा कार्यक्रम आहे.

शिवदारेंचे वर्चस्व रोखण्याचा प्रयत्न
सोलापूरसिद्धेश्वर सहकारी बँकेच्या १५ जागांसाठी ३५ अर्ज आले. मंगळवारी (ता. १७) उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस अाहे. त्याच दिवशी या बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. विद्यमान संचालक पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना शह देण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला होता. परंतु, बँकेच्या पोटनियमातील सुधारणांमुळे त्यांचे अर्ज बाद झाले. प्रत्यक्ष रणभूमीत येण्याअगोदरच त्यांना गारद करण्यात सत्ताधारी यशस्वी झाले. पण उर्वरितांना राजकीय बळ मिळाले तर या बँकेची निवडणूक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकेवर राजशेखर शिवदारे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांचे वर्चस्व संपवण्यासाठी काही नेते कामाला लागले आहेत. त्यामुळे ही निवडणूक होईल, अशीही चिन्हे आहेत.

‘मार्कंडेय’ची मदार बोल्लींवर
मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे संस्थेची निवडणूक अविरोध व्हावी, असे पूर्वभागातील नेत्या, कार्यकर्त्यांना वाटते. त्यासाठी ज्येष्ठ नेते सत्यनारायण बोल्ली यांना प्रेसिडेंटपदी बसवले. परंतु याच पदासाठी इच्छुक असणारी इतर मंडळी निवडणूक अविरोध करण्यासाठी प्रतिसाद देतील का, हा प्रश्न आहे. कुठलाच गाजावाजा करता, अश्विनी सहकारी रुग्णालयाची निवडणूक अविरोध झाली. त्याच पद्धतीने मार्कंडेयची निवडणूक व्हावी, असे बोलले जाते. परंतु काही इच्छुकांनी आतापासूनच बोहल्यावर चढण्यास सुरुवात केली. त्या सर्वांना विश्वासात घेण्यात बोल्ली कुठली भूमिका बजावतात, याकडेच आता लक्ष लागलेले आहे.