आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रीज, कूलर, एसी अन् खुल्या जागांमध्ये गुंतवणुकीची गुढी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी शुक्रवारी शहरातील प्रमुख बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या होत्या. मोबाइल, लॅपटॉप, फ्रीज, कूलर, एसी आदी खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. शिवाय रियल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक झाली. सोने खरेदीचा शुभमुहूर्त असतानाही सराफा व्यापाऱ्यांच्या बंदमुळे सुवर्णपेढ्या बंद होत्या. पूर्व मंगळवार पेठेतील सराफ बाजारात शुकशुकाट होता. गुढीपाडव्याला सराफ दुकाने बंद असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला मोठी खरेदी होते. यंदा दुष्काळ असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकवर्ग बाजारपेठेत फिरकला नाही. शहरी ग्राहकांकडून मात्र अपेक्षित खरेदी झाल्याचे व्यापारी म्हणाले. तरुणांत नव्या तंत्राच्या मोबाइल, लॅपटॉपची मागणी होती. त्याच्या खरेदीवर काही वस्तू मोफत देण्याची योजना राबवण्यात आली होती. शिवाय लॅपटॉप खरेदीला कर्जाची सोयही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या योजनेला मोठा प्रतिसाद दिला. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचीही मोठ्या संख्येने विक्री झाल्याचे येथील वाहन वितरकांनी सांगितले. एकूणच बाजारपेठेत खरेदीचा उत्साह होता.

प्रतीकात्मक गुढी
शुभगोष्टींचे प्रतीक म्हणून गुढीकडे पाहिले जाते. छोटी रेशमी गुढी घेऊन पाडवा साजरा करण्याचे प्रमाण यंदा मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसले. सोशल मीडियात गुढीपाडव्याच्या निमित्ताने कल्पक, अलंकारिक शुभसंदेशांची रेलचेल होती.

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा सण सुवासिनींनी घरोघरी आनंदात साजरा केला. नटून थटून महिलांनी रेशमी साड्या, साखरहारांसह घरासमोर गुढी उभी केली. नवीन वर्ष आनंद, सुख समृद्धी घेऊन येवो, बळीराजाच्या घरी आनंद नांदो अशी प्रार्थना करण्यात येत होती. कलश, कडुनिंबाची पाने, पुष्पहार, साखरगाठी, जरीची साडी, वेळू काठी, श्रीफळ, हळदीकुंकू, पाट आणि सुपारी या साहित्याने पूजा मांडून दारांना आंब्याची पाने, दारासमोर रांगोळी आणि घरात पुरणपोळीच्या गोडाधोड नैवेद्य अशी जय्यत तयारी होती. त्यामुळे संपूर्ण शहरभर चैतन्याचे वातावरण हाते.

जागेवरच बुकिंग केल्यास सवलती
^गुंतवणुकीला उत्तमपर्याय म्हणून सोरेगावजवळ खुल्या प्लॉटचा प्रकल्प सुरू केला. त्यात गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुंतवणूक करण्यासाठी चांगलाच प्रतिसाद मिळाला. एक आधुनिक जीवनशैलीच्या या प्रकल्पांना अनेकांनी भेटी दिल्या. जागेवरच बुकिंग करणाऱ्यांना मोठी सवलत दिली. अवघ्या २१ हजार रुपयांत प्लॉट बुक करण्याची संधी दिली.” कल्पना शर्मा, रियलइस्टेट क्षेत्र

फ्रीज, कूलरकडे लोकांचा आेढा
^यंदा उन्हाची तीव्रता वाढली. तो सुसह्य करण्यासाठी कूलर, एसी आणि फ्रीज आदी खरेदी करण्यात ग्राहकांचा कल दिसून आला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केल्यास आकर्षक योजना दिल्या. लॅपटॉप, मोबाइल खरेदीवरही काही वस्तू मोफत दिल्या. त्याला तरुण ग्राहकांनी प्रतिसाद दिला. अपेक्षित विक्रीही झाली.” विजय गोसकी, इलेक्ट्रॉनिक्सवस्तू विक्रेते

वाहन क्षेत्रात २५ कोटींची उलाढाल
^वाहनक्षेत्रात अपेक्षित विक्री झाली तरी गत वर्षाच्या तुलनेत १० टक्के कमीच उलाढाल झाली. जिल्ह्यातील दुष्काळ हे त्याचे प्रमुख कारण आहे. तरीही सर्व कंपन्यांच्या वितरकांनी ३००० दुचाकी तर ७०० चारचाकी विकल्याचा अंदाज आहे. यात २५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. विडी कारखाने बंद असल्याचा परिणामही जाणवला अाहे.” शिवप्रकाश चव्हाण, वाहनविक्रेते
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सराफांचा संप सुरू असल्याने शुक्रवारी दुपारी दुकाने बंद होती. त्यामुळे सराफा बाजारात शुकशुकाट दिसून आला.