आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतता, बंधुभाव, सुव्यवस्था नांदू दे - नमाजानंतर अल्लाहचरणी शहर काझी यांची प्रार्थना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ईदगाह मैदान, होटगी रस्ता - देशातबंधुभाव, शांतता आणि सुव्यवस्था नांदो. फायदेशीर पाऊस पडो. दहशतवाद करणारे आणि दहशतवादाच्या नावाने इस्लामला बदनाम करणारे नष्ट होवोत, अशी प्रार्थना शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली काझी यांनी बकर ईदच्या नमाजानंतर केली. नमाज झाल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

होटगी रोडवरील आलमगीर ईदगाह येथे बकर ईदचे सामूहिक नमाज पठण करण्यात आले. शहर काझी म्हणाले, बकर ईदच्या निमित्ताने हजरत इब्राहिम आणि हजरत ईस्माईल यांचे विचार आत्मसात करा. त्यांच्याप्रमाणे आई-वडिलांचा आदर करा. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. तिला कधीही नाराज करू नका. मुलांना चांगले संस्कार द्या. त्यांना उच्च शिक्षण द्या. एकदुसऱ्यांच्या बाबतीत चांगले विचार करा.

दहशतवादीकृत्यांना बळी पडू नका : रजवी
सावरकर मैदान - भारतहा अनेक संस्कृतींचा मान राखणारा देश आहे. परंतु, सध्या काश्मीरमध्ये जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ती चुकीची आहे. भारतीय मुस्लिमांनी कोणत्याही दहशतवादी कृत्यास बळी पडू नये, असे आवाहन मौलाना अब्दुस सलाम रजवी यांनी केले. सावरकर (आसार) मैदान येथे झालेल्या बकर ईदच्या नमाजानंतर मौलाना यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अलीकडे पोलिसांवर हल्ले होत आहेत, ते चुकीचे आहे. ते आपले रक्षक आहेत. त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवा, असे आवाहन केले.

समाजात सुव्यवस्था अबाधित ठेवा : नदाफ
पानगल प्रशाला मैदान - पानगलप्रशालेच्या आवारातील शाही आलमगीर ईदगाह येथे पाच ते सहा हजार मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. अब्दुल कादर नदाफ यांनी नमाज पठण केले. शहर काझी अॅड. अब्बास काझी यांनी समाजात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. मुलांना सुसंस्कृत बनवा, बंधुभावाने राहा, असे ते म्हणाले.

मानवजात हीच महत्त्वाची : मौलाना बेग
रंगभवन मैदान : इस्लामधर्मात उच्च, नीच गरीब-श्रीमंत, जात, पात, भेदभाव या गोष्टींना थारा देण्यात आलेला नाही. सर्वांना समान वागणूक देत मानव जातीला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे इस्लामच्या संदेशानुसार सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने आपुलकीने वागावे, असे आवाहन मौलाना ताहेर बेग यांनी केले. रंगभवन येथील ईदगाह मैदानावर बकर ईदचे सामूहिक नमाज पठण करण्यात आले. इस्लाममध्ये आतंकवाद्यांना जागा नाही, असे बेग म्हणाले.

त्याग,बलिदानाची परीक्षा पाहणारी ईद : कादरी
जुनी मिल कंपाऊंड - बकरीईद ही त्याग आणि बलिदानाची परीक्षा पाहणारी आहे. ईश्वरनिष्ठेची शिकवण मिळते, असे खतीब फैजुल्ला कादरी यांनी प्रवचनामध्ये सांगितले. बकरी ईदनिमित्त जुनी मिल कंपाऊंड येथील आदिलशाह ईदगाह येथे नमाज पठणानंतर ते बोलत होते. ईश्वर निष्ठेपासून माणसाचे मन दुरावल्याने आज अनेक हिंसक घटना घडत आहेत. ईदनिमित्त जे दान करता त्यामध्ये दुजाभाव करू नये, असे खतीब फैजुल्ला कादरी यांनी सांगितले.

पोलिसांचा होता चोख बंदोबस्त
ईदगाहमैदानावर महापालिका आणि पोलिस विभागाने जय्यत तयारी केली होती. नमाजासाठी सकाळी सात वाजल्यापासून मुस्लिम बांधव ईदगाह येथे जमत होते. नमाज झाल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा देत होते. मदरशासाठी वर्गणी गोळा करणाऱ्यांना सढळ हाताने मदत करण्यात येत होती. सर्व ईदगाह मैदानांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बातम्या आणखी आहेत...