आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच घटना : वीज कोसळून मुलासह 21 शेळ्या, 1 गाय ठार; महिला जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर-  अक्कलकोट, करमाळा वीजकोसळून जिल्ह्यात रविवारी (दि. १५) एक शाळकरी मुलगा ठार झाला. तर एक विवाहित महिला जखमी झाली. २१ शेळ्या, एक गाय ठार झाली. तसेच मोहोळ पोलिस ठाण्याच्या टाॅवरवरही वीज कोसळली. त्यामुळे नुकसान झाले. श्रीकांत मल्लिनाथ धनशेट्टी (वय १३, रा. नागणसूर, ता. अक्कलकोट) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे, साळूबाई सुरेश बदे (३०, रा. उमरड, ता. करमाळा) असे जखमी महिलेचे नाव आहे. धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील इंदूबाई मलका रणधरे, प्रभावती बाबू मिसाळे, नाना शेख यांच्या २१ शेळ्या, वडवळ (ता. मोहोळ) येथील गंगाधर मारुती गुंड यांची गाय ठार झाली. 

नागणसूर येथील श्रीकांत हा शेतात गायी चारावयास गेला होता. सायंकाळी जोरदार पावसात वीज कोसळल्याने तो जागीच ठार झाला. त्याचे वडील मल्लप्पा धनशेट्टी यांनी येथील दक्षिण पोलिस ठाण्यात खबर दिली. तलाठी एस. पी. पाटील, नुरोद्दीन मुजावर ग्रामविस्तार अधिकारी प्रदीप तोरसकर यांनी पंचनामा केला. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला होता. दुपारी अडीचच्या समुारास पावसात सुरेश बदे यांच्या पत्र्याच्या घरावर वीज कोसळली. यात साळूबाई या जखमी झाल्या. विजेमुळे घराच्या विटाही निघून पडल्या. वीज पडल्यानंतर साळूबाई बेशुद्ध पडल्या. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याची रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयाकडे खबर नव्हती. 

धाेत्री येथील गोकुळ शुगर कारखान्यापासच्ून अर्धा किलोमीटर अंतरावर इंदूबाई रणधरे, प्रभावती मिसाळे, नाना शेख यांच्या शेळ्या चरत होत्या. तेथे वीज कोसळली. २१ शेळ्या जागीच ठार झाल्या. यात इंदूबाई यांच्या नऊ, प्रभावती यांच्या ११ शेळ्या तर नाना यांच्या दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. वळसंग पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, मंद्रूप, निंबर्गी, विंचूर, भंडारकवठे, कंदलगाव, वांगी, औराद, होटगी, धोत्री, दर्गनहळ्ळीसह अनेक भागात जोरदार पाऊस पडला. रात्रीपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. तसेच मोहोळ पोलिस ठाण्याच्या टॉवरवर वीज पडल्याने संगणकासह वायरलेस यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुपारी सव्वाचारच्या सुमारास वडवळ येथे वीज कोसळून गंगाधर गुंड यांची गाय ठार झाली. पावसामुळे शिरापूर येथील भिकाजी गणेश कुलकर्णी यांची म्हैस मरण पावली. 

मोहोळ पोलिस ठाण्याचे नुकसान
मोहोळ पोलिस ठाण्याच्या टाॅवरवर वीज कोसळल्याने आठ संगणक संच, आठ प्रिंटर, एक वायरलेस, एक विद्युतपंप, लॅपटॉप, नऊ पंखे, दोन इनव्हर्टर मशिन, लँडलाइन फोन, सीसीटीव्ही मशिन, चार कॅमेरे, झेरॉक्स मशिन, दोन टीव्ही यांचे नुकसान झाले. विजेची वायर जळाली. तसेच तहसीलमधील दोन संगणक संच, सेतू कार्यालयातील इनव्हर्टर संच, बॅटरी नादुरुस्त झाल्या. 
बातम्या आणखी आहेत...