आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवा निमित्त "दिव्य मराठी 'मध्ये साहित्यिकांचा संवाद, विठ्ठल रामजी शिंदे यांचे अस्पृश्य उद्धाराचे कार्य दुर्लक्षितच...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगवेगळ्या भाषेतील अनेक मान्यवर लेखकांचे साहित्य भाषांतर करून घेतले. ते वाचकांच्या पसंतीस उतरते आहे. मात्र, अद्याप अनुवादकास म्हणावा तेवढा मान मिळाला नाही. लेखकाने भाषांतर केल्यावर त्याला त्या भाषेचा गाभा कळतो असा सूर संवादातून उमटला.

दलित साहित्य हिंदीतून देशात : निशिकांत ठकार
साहित्याचा अनुवाद हे क्षेत्र गौण मानण्यात येते. सध्या नवीन कोणते नाही, पण काही मागचीच अपुरी कामे पूर्ण करण्याचे काम चालू आहे. लेखकाने किमान एकतरी भाषांतर करावे असे वि. दा. करंदीकर म्हणत असत. त्यानुसार हे काम चालू आहे. मराठीतील बरेच साहित्य हिंदीत अनुवाद केले. भारतीय भाषाविश्वात पोहोचण्यास हे काम महत्त्वाचे आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाटक सिनेमा विषयावर लिहिणे थांबवले आहे. काही लेखकांच्या पूर्वी मुलाखती घेतल्या, त्याचे काम चालू आहे . मराठीतून हिंदीत येणाऱ्या अनुवादित साहित्याला दलित साहित्याला चांगला मान आहे. गो. मा. पवार सरांनी अनेक विद्यार्थी घडवले. अनेकांचे ते पीएचडीसाठी मार्गदर्शक होते आणि आहेत.
वेगळे लिहण्याची उर्मी जिवंत : सुरेखा शहा
आज वयाच्या ७५ व्या वर्षी ४० वर पुस्तके प्रकाशित झाली. काहीतरी वेगळे लिहिले पाहिजे ही उर्मी माझ्यात पहिल्यापासून होती. राजेंद्रसिंह यांच्या जोहड या कादंबरीला बरीच प्रसिद्धी मिळाली. सध्या पुण्यातील ३० कर्तृत्ववान महिलांचा परिचय हे पुस्तक लिहित आहे. घरचा कामाचा व्याप सांभाळून, पोळ्याला बाई लावता हे काम मी करते. रोज तीन ते चार तास लेखन करते. कथा, कविता, कादंबरी, ऐतिहासिक लेखन, एकांकिका असे अनेक प्रकार हाताळलेले आहेत. यात पुस्तकांच्या विषयाच्या अनुषंगाने बरेच संशोधन आणि प्रवास झाला. या निमित्त हाेणारे जगाचे दर्शन महत्त्वाचे वाटते. भारतातील विविध जातींमधील विवाह पद्धती यावर कादंबरी इ-बुकवर येत आहे. त्याचा इंग्रजी अनुवाद होत अाहे.

कालानुरूप रामजी शिंदे यांच्या कार्याची दखल समाजाकडून घेतली जाईल. : प्रा. डॉ. गो. मा. पवार
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे अस्पृश्य उद्धाराचे कार्य अद्यापही दुर्लक्षित आहे. त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी संशोधनात्मक पुस्तक लिहिले. वि. रा. शिंदे यांनी महात्मा फुले यांचे दलिताेद्धाराचे कार्य अखिल भारतीय पातळीवर नेले. त्यांची रोजनिशी हा तर अपूर्व अनुभव आहे. इंग्रजीत सुधाकर मराठे यांनी त्याचे भाषांतर केले असून तामिळ भाषेत ते चालू आहे. प्रत्येक जातीला कोणते ना कोणते पुढारी मिळत गेले, त्यामुळे वि. रा. शिंदे यांचे कार्य दुर्लक्षित राहिले. पण कालानुरूप त्यांच्या कार्याची दखल घेतली जाईल. खरे म्हणजे विनोद या विषयावर हसत खेळत निर्मिती होत असल्याने त्याच्या गंभीर संशोधनाकडे कोणी पाहिले नाही.
साहित्य संमेलनाबद्दल ते म्हणाले की, हा वादाचा विषय नाही. विनोदाची निर्मिती होते कशी याबाबत समीक्षा आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य माझे अभ्यासाचे आवडते विषय आहेत. माेहोळ तालुक्यातील नरखेड हे माझे गाव. वयाच्या दहाव्या वर्षी माझे दोन चुटके त्यावेळी समाचारमध्ये प्रसिद्ध झाले हाेते. विनोदी साहित्याच्या समीक्षेत काही वेगळे सांगायचा माझा प्रयत्न असतो. उदा. ‘गारंबीचा बापू’ हे रंजक साहित्य तर ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक कौटुंबिक प्रकारात मोडते. हे माझे संशोधन त्यावेळी तरी कोणी खाेडून काढले नाही.
लीळाचरित्रातील विनोद यावर मी लिहिले. विनोद तत्त्व आणि चिंतन हा माझा ग्रंथ अभ्यासपूर्ण असल्याचे सिद्ध झाले अाहे. शिवाय ‘मराठी विनोदाची विविध अंत:रूपे’ पुस्तक आहे.
दिव्य मराठी कार्यालयात सोमवारी ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. गो. मा. पवार, निशिकांत ठकार, सुरेखा शहा यांच्यात असा संवाद रंगला.