आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारनियमनाचा बीएसएनएललाही सुरूंग; बिल भरणा, आधार लिंकिंगही खोळंबले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्ह्यात अवेळी वेळी सुरू असलेल्या भारनियमनाचा फटका बीएसएनएलच्या ग्राहकांनाही सहन करावा लागत आहे. मुख्य कार्यालयातील वीज सेवा पूर्ण ठप्प झाल्यामुळे बिल भरणे, आधार अन्य सेवा पूर्णपणे ठप्प होत आहेत. येथील जनित्रही बंद असल्यामुळे ग्राहकांना काम होण्यासाठी तीन ते चार तास प्रतीक्षा करावी लागत अाहे. मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अन्य कामांचा खोळंबा होत असल्याने तेही वैतागले आहेत. 
 
महावितरणकडून वेळी अवेळी करण्यात येत असलेल्या भारनियमनाचा फटका सर्वच कामांना बसत आहे. यामधून महत्त्वाचे विभागही सुटू शकलेले नाहीत. जिल्हा रुग्णालयासोबत आता बीएसएनएलच्या कामकाजालाही महावितरणच्या भारनियमनाचा फटका बसला आहे. मात्र, बीएसएनएलचा बेजबाबदारपणाचा कारभारही यासाठी कारणीभूत आहे. वीज बंद झाल्यानंतर जनित्र (जनरेटर) सुरू करणे अपेक्षित आहे. यासाठी येथे शक्तीशाली जनित्र बसवण्यात आले आहे. परंतु, केवळ एका स्विचच्या नादुरुस्तीमुळे जनरेटर सुरू करता येत नाही. यामुळे वीज गेल्यानंतर बीएसएनलचे मुख्य मुख्यालय पूर्णत: अंधारात बुडून जाते. सर्व यंत्रणा संगणकीकृत आहे. मात्र, संगणकच बंद पडत असल्यामुळे कामांचा खोळंबा होत आहे. सोमवारपासून वीज बंद पडत आहे. तेव्हापासूनच दररोज येथे बिल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना सातत्याने ताटकळावे लागत आहे. सध्या बिल भरण्यासाठी बाहेर सुविधाही नाहीत. ऑनलाइन भरणा अनेकांना करता येत नाही. त्यामुळे येथे येऊन पोस्टपेड मोबाइल लँडलाइनचे बिल भरण्याशिवाय ग्राहकांना पर्याय उरला नाही. मात्र, विजेअभावी बिल भरता येत नसल्यामुळे अनेकांना विलंब शुल्कांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच अनेकांची आउटगोइंग सेवाही बंद पडली. 
 
ग्राहकांमध्ये संताप 
ग्राहकांमध्येबीएसएनएलच्या अशा बेफिकीरीबद्दल संतापाचे वातावरण आहे. ग्राहक येथील कर्मचाऱ्यांना जनरेटर सुरू करण्याची विनंती करतात. मात्र, कर्मचारीही हतबल आहेत. यासंदर्भात बीएसएनएलचे जिल्हा महाप्रबंधक एम. के. सूर्यवंशी यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी संपर्क साधला असता, त्यांनी मिटींगमध्ये बिझी असल्याचे सांगत बोलने टाळले. 
 
ग्रामीणमध्ये मोबाइल सेवा ठप्प 
ग्रामीणभागात अनेक मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या चांगल्या नाहीत. जनित्रही सुरू केल्यामुळे ग्रामीण भागातील सेवा भारनियमनामुळे बंद पडत आहे. बीएसएनएलचे ग्रामीण भागातील ग्राहक वैतागले आहेत. मोबाइलच्या बंद सेवेमुळे ग्राहकांची कामे खोळंबत आहेत. बीएसएनएलला मुख्यालय ग्रामीण भागातील जनरेटरसेवा सक्षम करण्याची गरज आहे. 
 
आधार लिंकिंग बंद 
बीएसएनएल मोबाइल क्रमांकासाठी अाधारलिंकिंग अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, वीज बंद पडल्यानंतर ही कामेही ठप्प होत आहेत. यामुळे ग्राहकांना मोबाइल क्रमांक बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच बिल काढणे, त्याचे डिटेल्स काढणे, कार्यालयातील अंतर्गत कामे ठप्प होत आहेत. यामुळे कर्मचारीही वैतागून गेले आहेत. वीज असताना त्यांना कामे करून घेण्यासाठी गडबड करावी लागत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...