सोलापूर - गणेशोत्सव काळात काही मंडळांकडून होणारी वीजचोरी थांबवण्यासाठी महावितरणाने वेगवेगळी पथके नेमली आहेत. या पथकांद्वारे प्रबोधन आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आवश्यकता पडल्यास पोलिसांची मदत घेण्याची तयारी महावितरणने केली आहे. त्यामुळे वीजचोरांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
सोलापूर शहरात महावितरणचे पाच विभाग आहेत. या विभागांद्वारे ग्राहकांना वीजपुरवठा करणे समस्या सोडवणे आदी कामे करण्यात येतात. उत्सव काळातील वीजचोरी रोखण्यासाठी विभागनिहाय पथके तयार करण्यात येणार आहेत. या पथकांद्वारे त्या त्या परिसरात पाहणी करून वीजचोरांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
प्रबोधनासाठी दामिनी पथक
रितसरवीज जोडणी घेण्याऐवजी काही मंडळे वीजचोरी करतात. अशावेळी दामिनी पथक प्रत्यक्ष जाऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेईल. प्रबोधन करून वीजजोडणी घेण्याचे आवाहन करेल.
विजेच्या उच्च दाबाच्या वाहिनीखाली मंडप असू नये, मंडपातील विजेच्या वायरिंगचे काम अधिकृत व्यक्तींकडून करून घ्यावे, विद्युत खांबावर चढून पताका अथवा पोस्टर लावू नये.
मंडळांच्या वीज वापर क्षमतेनुसार त्यांच्याकडून डिपॉझिट आकारणी करण्यात येणार आहे. ही जोडणी देताना मंडळांना सूचना देण्यात येणार आहेत.
उत्सवा करिता गणेश मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरती वीज जोडणी दिली जाणार आहे.
मिरवणुकीमध्ये वाहन, मूर्ती इतर सजावट यांची उंची जमिनीपासून १५ फुटांपेक्षा जास्त ठेवू नये, घरगुती, खासगी मीटरमधून अनधिकृतपणे वायर्स ओढून कनेक्शन घेऊ नयेत.
झोन पथकाद्वारे कारवाई
सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजचोरीसारखे प्रकार करू नयेत. प्रबोधन करून ऐकले नाही तर झोन पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल. यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येईल. एस.बी. साळे, अधीक्षक अभियंता, महावितरण
महावितरण नेसर्व मंडळांची वीज जोडणी तपासावी. विजेची चोरी झाल्यास कारवाई करावी. बंदोबस्त पाहिजे असेल तर आम्ही देऊ. सूर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक, विशेष शाखा