आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानपरिषद निवडणूक पराभव; कारवाई नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता. त्याचा अहवाल पक्षाला मिळाला आहे. मात्र, यात दोषी असणाऱ्यांना साधी नोटीसही बजावण्यात आलेली नाही. पक्षाविरुद्ध काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मन:स्थितीत पक्ष नसल्याचे दिसते. निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर झाल्याची चर्चा झाली होती.
केंद्र राज्यातील सत्ताकेंद्रे बदलली तरी सोलापूर जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला धक्का मिळाला तो विधानपरिषद निवडणुकीत. विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना मोठ्या फरकाने पराभवास सामोरे जावे लागले. यामध्ये मित्रपक्ष काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीच्याच काही मतदार सदस्यांनी विरोधात मतदान केले. मात्र निवडणुकीपूर्वी माजी उपमुख्यमंत्री पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी ‘गद्दारी कराल तर गाठ माझ्याशी आहे’, असा इशाराही दिला होता. मात्र याचा परिणाम मतदारावर झाला नाही. नको होते तेच झाले. जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी गोपनीय अहवाल पक्षाला सादर केला असला तरी पक्षविरोधी मतदान करणाऱ्यांना पक्षपातळीवरून साधी नोटीसही बजावली नाही, हे विशेष.

आगामी महापालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांना कष्ट घ्यावे लागणार आहेत. सोमवारी दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविली असली तरी या बैठकीत पराभवासंबंधीच अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या पुढील धोरणासंबंधी प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडून मते जाणून घेण्यात येणार आहेत.

विधानपरिषद निवडणुकीपूर्वी माजी उपमुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार सोलापूर मुक्कामी होते. त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चाही केली होती. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षाचीही ताकद लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मतदारांच्या मनात राष्ट्रवादीतील काही प्रमुखांनीच सुधाकर परिचारक यांना दिलेल्या शब्दापुढे ही ताकद खूपच कमी पडली. मात्र याबाबत खुद्द साळुंखे यांनाही काहीच करता आले नाही.

गोपनीय अहवाल
^विधान‑परिषदनिवडणुकीतील पराभवासंबंधी पक्षप्रमुखांशी चर्चा केली आहे. निवडणुकी संबंधीचा गोपनीय अहवाल पक्षप्रमुख शरद पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सादर केला आहे. याबाबत पक्षाकडून कारवाई होईल.” दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापूर