आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माघी यात्रेची दर्शनरांग पोहोचली पत्राशेडपर्यंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - माघी एकादशी सोहळ्यात सहभागासाठी राज्याच्या विविध भागातून रेल्वे, एसटी खासगी वाहनांनी वारकरी मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. तसेच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील दगडी पुलानजीक ६५ एकर जागेवर वारकऱ्यांच्या निवासाची सोय केली आहे. दरम्यान, नवमी दिवशी मंगळवारी (दि. १६) सायंकाळी श्री विठ्ठल पदस्पर्श दर्शनाची रांग पत्रा शेडपर्यंत गेली होती. दर्शनासाठी नऊ ते दहा तासांचा कालावधी लागत होता.
माघी एकादशी सोहळा गुरुवारी (दि. १८) आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा दुष्काळामुळे भाविकांची संख्या घटली आहे. भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. चंद्रभागा वाळवंटात भाविकांना कीर्तन, प्रवचन करता यावे यासाठी पालिका, महसूल कर्मचारी पोलिस अतिक्रमण काढत होते. पालिकेने वाळवंटात साफसफाई केल्याने स्वच्छता आहे. मात्र, अद्यापही शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे जैसे थे आहे. त्यामुळे एकादशी व्दादशीला दिंड्यांसह प्रदक्षिणा करताना भाविकांना त्रास होईल. दरम्यान मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, स्टेशन रस्ता हे मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.

६५ एकरांवर सुविधा
६५ एकरांवर प्रशासनाने वीज, पाणी, तात्पुरत्या शौचालयांसह विविध सुविधा पुरवल्या आहेत. भाविकांना वास्तव्यासाठी छोटे प्लॉट पाडून तंबू, राहुट्या उभारण्याची सोय केली आहे. येथे सुमारे एक लाख ७५ हजार भाविकांची निवासाची सोय होईल. त्यांना मार्गदर्शनासाठी परिसरात सुविधा केंद्राची उभारले आहेत. यात पालिका, महसूल कर्मचाऱ्यांची २४ तास निुयक्ती केल्याचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंगळवारी दुपारी गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड पर्यंत गेलेली होती.