आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानकर म्हणाले, बारामतीत धनगर समाजाने मला मते दिली नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - ‘धनगर समाज आणि धनगर आरक्षण आंदोलनामुळे आपण मंत्री झालो नाही. बारामती लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाने मला मते दिली असती तर मी केंद्रात मंत्री झालो असतो’, असे धक्कादायक वक्तव्य राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले. मात्र धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यास कटिबद्ध आहोत, असेही स्पष्ट केले. 
 
श्री. जानकर म्हणाले, ‘धनगर समाजाला अनुसूचित जमाती वर्गात आरक्षण देण्यात अनेक कायदेशीर अडचणी येत आहेत. त्या पूर्ण करून धनगर समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे. मात्र याच वेळेस धनगर समाजाचा मंत्री म्हणून मला जोखडून ठेवू नका, असे म्हणत त्यांनी धनगर समाजावर टीका केली. मी धनगर समाजामुळे, आरक्षणाच्या मागणीमुळे मंत्री झालो नाही. बारामती लोकसभा निवडणुकीत मला ब्राह्मण, मराठा बांधवांनीदेखील मते दिली. मात्र धनगर समाजाने मते दिली नाहीत. धनगर समाजाने मते दिली असती तर मी केंद्रात मंत्री झालो असतो.’ 
 
धनगर समाजाला आरक्षण देण्यास कोणतीही घाई करणार नाही, असे सांगताना त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील टोला लगावला. पृथ्वीराज चव्हाण यांनी घाई गडबड केली आणि त्यामुळेच मराठा आरक्षण आता रखडले आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत अशी परिस्थिती होऊ नये, असेही त्यांनी सांगितले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वाद तुम्ही सोडवणार का? या प्रश्नाला उत्तर देताना जानकर यांनी सांगितले की, या दोघांमधील वाद मिटावा यासाठी प्रयत्न करीन. अजून कोठे वाद झाला तर मी पॅचवर्क करीन, असेही त्यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागू नये, यासाठी प्रयत्न 
राज्यसरकार शेतकऱ्यांना वारंवार कर्ज काढावे लागणार नाही या करिता योग्य ती पावले उचलत आहे, असेही त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 
राज्याचे दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासमवेत गिरीश काळे, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे आदी. 
बातम्या आणखी आहेत...