आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'भीमा\' महाडिकांचाच; परिचारक-पाटलांचा धुव्वा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ - टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी खासदार मुन्ना ऊर्फ धनंजय महाडिक गटाने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. सरासरी साडेचार हजारहून अधिक मताधिक्य मिळवत सर्वच्या सर्व जागा जिंकून महाडिक गटाने विरोधी माजी आमदार सुधाकर परिचारक राजन पाटील यांच्या पॅनेलला धूळ चारली.

भीमा कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी खासदार महाडिक यांंच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनेलला माजी आमदार परिचारक पाटील यांच्या भीमा परिवर्तन शेतकरी पॅनेलने आव्हान दिले. त्यामुळे ही निवडणूक चर्चेची ठरली. विरोधी परिचारक-पाटील गटाच्या परिचारकांसह चार प्रमुख उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीतील हवा निघून गेली होती. मात्र, नंतर महाडिक यांचे कोल्हापुरातील विरोधक आमदार सतेज पाटील हेही प्रचाराच्या मैदानात उतरल्याने चुरस वाढल्याचे चित्र होते.

मंगळवारी (दि. १५) या निवडणुकीची मतमोजणी झाली. पहिल्या फेरीत सुरुवातीपासूनच महाडिक गट आघाडीवर असल्याने त्यांच्या समर्थकांत उत्साह संचारला होता. संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून विष्णुपंत महाडिक यांनी बाजी मारत पहिला विजय मिळवल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महाडिक गटाच्या उमेदवारांनी सरासरी साडेचार हजारहून अधिक मताधिक्य मिळवले.

सभासदांचा विजय
कोल्हापूरची राजकीय लढाई सोलापूर जिल्ह्यात येऊन लढणाऱ्या आमदार सतेज पाटील यांना द्वेषाने पछाडले आहे. त्यांचा भीमा कारखान्याशी काही संबंध नाही. केवळ माझ्या विरोधासाठी त्यांनी येथील विरोधकांना रसद पुरवून निवडणूक लावली होती. मात्र, "भीमा'चे सभासद त्यांच्या भूलथापांना बळी पडता विकासाच्या मागे राहिले. त्यामुळे हा सभासदांचा विजय आहे. खासदार धनंजय महाडिक, प्रमुख,भीमा शेतकरी विकास आघाडी

सभासद वाढीमुळेच...
सत्ताधाऱ्यांनी नवीन चार हजार सभासद केले आहेत. त्यातील ११५० सभासद हे कोल्हापूर भागातील आहेत. त्याचा फटका आम्हाला बसला. तसेच आम्हा चार प्रमुख उमेदवारांचे अर्ज असते तर निकाल वेगळा लागला असता. सुधाकर परिचारक, प्रमुख,भीमा परिवर्तन शेतकरी विकास आघाडी

आम्ही कमी पडलो
लोकशाहीत मतदारांनी दिलेला निर्णय आहे. आम्ही सभासदांपर्यंत पाेहोचण्यात कमी पडलो. त्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. राजन पाटील, प्रमुख,भीमा परिवर्तन शेतकरी विकास आघाडी
बातम्या आणखी आहेत...