सोलापूर - सोलापुरात एकीकडे पाण्याची टंचाई असून चार दिवसांअाड येणारे पाणी वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. तर दुसरीकडे औज बंधारा ते सोरेगाव दरम्यान जलवाहिनीला असलेल्या गळतीचा फायदा उठवत पाणी शेतात मुरवण्याचा प्रकार सर्रास सुरू अाहे. या पाणीचोरीकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने सोलापूरकारांना िमळायला हवे ते पाणी असे वाया जात अाहे.
मंगळवारी या ठिकाणच्या वाॅलमधून किरकोळ गळती होत होती. पण बुधवारी गळती वाढल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीस पाहणी करताना आढळून आले. याच्याजवळच्या हाैदातून गळती होत अाहे. दोन्ही ठिकाणचे पाणी ५० मीटर अंतरावर असलेल्या सिमेंट पाइपमधून नाल्याद्वारे वाहत असून ते पुढे कुठे जाते हे कळून येणार नाही अशा पध्दतीने पाणीचोरी होत असल्याचा संशय बळावला अाहे.
दोनते तीन इंच गळती : दाेन्हीठिकाणची एकूण गळती दोन ते तीन इंच असून ही चोवीस तास सुरू आहे. त्यामुळे रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मुरणारे पाणी कोठे प्रवाहित होते याचा शोध महापालिकेने घेतला तर सत्य बाहेर येईल. पण महापालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू अाहे. त्याकडे महापालिकेनेही दुर्लक्ष केले अाहे. पाणीचोरांवर कारवाई व्हावी.
बीपीटीजवळ सुरक्षा रक्षक नाही : नांदणी बीपीटीजवळ महापालिकेने सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना केली नाही. त्या परिसरात कोणही येऊ शकतो. काहीजण बीपीटीवर चढून बसतात.
टाकळी ते सोरेगाव दरम्यान तीन ठिकाणी गळती असल्याचे सांगण्यात आले. त्यात होनमुर्गी फाटा येथे दोन तर टाकळी परिसरात एक गळती आहे. नांदणी बीपीटीजवळ गळती असल्याचे मनपा अधिकाऱ्यांना माहीत नाही. या परिसरात शेती अाहे. त्यामुळे हे पाणी कोणाच्या शेतात मुरते याचा शोध अाता महापालिकेने घेतला पाहिजे.
पाणीचोरी प्रकरण थांबलेच : पुणेरोडवर पाइपलाइनला गळती निर्माण करून तेथून शेतासाठी पाणी चोरले गेल्याचे प्रकार उघड झाले होते. तेव्हा मनपातील एका अधिकाऱ्यावर िनलंबनाची कारवाई झाली. पण नंतर पाणीचोरी शोधण्याची मोहीम स्मार्ट सिटीच्या प्लॅनिंगमध्ये हरवून गेली. त्यामुळे पाणी चोरांचे पुन्हा फावताना िदसत अाहे. अाता महापालिकेने पुन्हा पाणीचोरी रोखण्यास मोहीम सुरू करावी.