आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकपाण्याची कमतरता, युद्धासारखी स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - हुलजंती येथे रविवारी (दि. ३०) दुपारी चारच्या सुमारास श्री महालिंगराया हुन्नूरचा बिरोबा या गुरू-शिष्य भेटीचा अनुपम सोहळा पार पडला. तीन लाखांहून अधिक भाविकांनी श्री महालिंगराया बिरोबाचा जयघोष, भंडारा लोकर याची मुक्त उधळण करत हा सोहळा आपल्या डोळ्यांत साठवला. हा अपूर्व सोहळा देवस्थानजवळील ओढ्याकाठी झाला. तसेच येथील भाकणूक हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. श्री महालिंगराया देवस्थानच्या शिखरांना गुंडाळलेल्या मुंडासावरून आगामी वर्षांतील पीकपाणी, राजकारण, रोगराई याचा अंदाज केला जातो. यंदा शनिवारी रात्री मुंडासाचा सोहळा पार पडला. कळसाच्या सहाही बाजूंना मुंडास समान सोडलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकात पीकपाण्याची कमतरता राहील. राजकीय व्यक्तींसाठी हा धोकादायक काळ राहील. युद्धासारखी आपत्कालीन स्थिती निर्माण होईल. रोगराई वाढेल. पौर्णिमेच्या आत पाऊस पडेल. शेळ्या, मेंढ्या बैल यांची संख्या घटेल, असा मुंडासावरून पुजाऱ्यांनी अंदाज वर्तवला.
जलसंधारण मंत्री राम शिंदे, कर्नाटकच्या खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, आमदार भारत भालके, रामहरी रूपनवर, समाधान आवताडे, उद्योगपती सी. पी. बागल यांनी श्री महालिंगरायाचे दर्शन घेतले. दरम्यान, पोलिस बंदोबस्तासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, नामदेव शिंदेंसह तीन पोलिस निरीक्षक, ११ सहायक पोलिस निरीक्षक, १५७ पोलिस कर्मचारी, एक दंगा नियंत्रण पथक नेमले होते.

भंडारा, लाेकर याची मुक्त उधळण
या भेटीच्या सोहळ्याला प्राचीन परंपरा आहे. यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्रप्रदेशातून भाविक आले होते. शनिवार (दि. २८) पासूनच भाविकांनी गर्दी केली होती. ओढ्यात दोन्ही पालख्या भेटीसाठी येताच लाखो भाविकांनी त्यांच्यावर भंडारा लोकर याची मनसोक्त उधळण केली. चडचण, सोड्डी, मंगळवेढा मार्गावर भाविक आणि त्यांच्या वाहनांची गर्दी दिसत होती.

या पालख्यांच्या भेटी
पालखीभेट सोहळ्यात हुलजंतीचा श्री महालिंगराया, हुन्नूरच्या बिरोबासह सोन्याळचा विठोबा, उटगीचा ब्रह्मदेव, जिरांकलगीचा बिरप्पा, शिरढोणची शीलवंती, शिराढोणचा बिरोबा, कसगीचा श्री महालिंगरायाचा नातू बरगालसिद्ध आदी देवतांच्या पालख्यांचा समावेश होता.
हुलजंती (ता. मंगळवेढा) येथे श्री महालिंगराया हुन्नूर येथील श्री बिरोबा या गुरू-शिष्यांच्या पालखी भेटीचा सोहळा पार पडला. हा अनुपम सोहळा आपल्या डोळ्यांत साठवण्यासाठी महराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशातील लाखो भाविक उपस्थित होते. याप्रसंगी भाविकांनी भंडारा लोकर याची मुक्त उधळण केली. छाया: प्रशांत मोरे, मंगळवेढा
बातम्या आणखी आहेत...