आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मार्ड’चा संप मागे, डॉक्टर सायंकाळी कामावर हजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; ‘मार्ड’च्यावतीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरावर झालेल्या अन्यायाविरोधात संप पुकारला होता. त्यानुसार संबंधित विभागप्रमुख डॉ. व्यवहारे यांच्यावर कारवाई करत विविध प्रलंबित मागण्या शासनाने मान्य केल्या. त्यामुळे मार्ड संघटनेने संप मागे घेतला. सोलापुरातील मार्ड संघटनेचे पदाधिकारी असलेल्या डॉक्टरांनी सायंकाळी पाच नंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

मार्ड संघटनेने गुरुवारपासून राज्यव्यापी संप पुकारला होता. त्यात सोलापूर येथील मार्डच्या डॉक्टरांनी सहभाग नोंदवत कामबंद आंदोलन केले होते. परंतु, मार्डच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मुंबईत बैठक घेऊन नागपूर येथे शासकीय रुग्णालयात विभाग प्रमुख असलेल्या डॉ. व्यवहारे यांच्यावर कारवाई करत त्यांची बदली चंद्रपूर येथे केली असून त्यावर चौकशी समिती नेमली आहे. तसेच पदव्युत्तर पदवीच्या डॉक्टरांना पाच हजार मानधन मिळावे याकरता वारंवार आंदोलन केले होते. परंतु, मागणी मान्य केली नव्हती. ती मान्य करत जुलैपासूनचा फरक नोव्हेंबरचे वेतन वाढीव पद्धतीने देण्यात येणार आहे. क्षयरोग झालेल्या डॉक्टरांना पगारी रजा देण्यात येणार आहे.

तसेच फ्री शिपचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. प्रश्न सुटल्याने मार्ड संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेला संप मागे घेण्यात आला आहे.

कामात खंड नाही
पदव्युत्तर पदवीच्या डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारल्याने वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना तैनात करण्यात आले होते. गुरुवारी शुक्रवारी सकाळी १० पर्यंत लहान-मोठ्या अशा १९ शस्त्रक्रिया करून सिव्हिल प्रशासनाने चांगल्या कामाची चुणूक दाखवली आहे. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांची मदत घेतली.

प्रलंबित मागण्या मान्य
नागपूर येथे घडलेल्या प्रकारात डॉक्टरांवर कारवाई करत त्यांची बदली केली असून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या मान्य झाल्याने मार्ड संघटनेने बेमुदत संप मागे घेतला असून सायंकाळी नंतर कामावर हजर झालो आहोत.'' डॉ. कैलास कागणे, अध्यक्ष, मार्ड संघटना, सोलापूर