आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मार्कंडेय रथोत्सव मिरवणुकीत तरुणाई थिरकली ‘सैराट’वर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव गुरुवारी अत्यंत उत्साही वातावरणात साजरा झाला. मिरवणुकीत तेलुगु तरुणाई मराठमोळ्या गीतांच्या तालावरच नाचली. या गाण्यात शांताबाई, झिंगाट, सैराट लावण्यांचा जोर होता.
प्रारंभी पहाटे पाच वाजता विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी सात वाजता पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पंचकट्टा परिसरातील मार्कंडेय देवस्थान येथून सकाळी ११ वाजल्यापासून मिरवणुकीस सुरुवात झाली.

तरुणांच्या डान्स ग्रुप्सनी उपस्थितांचे लक्ष वेधले. ओम शिव डान्स ग्रुप, जीडी डान्स, साईलीला सेव्हन एचग्रुप, न्यू डी एस ग्रुप, आर्या टू डान्स ग्रूप, शिव मार्कंडेय प्रतिष्ठान आदींचा सहभाग होता. दत्तात्रय शक्ती लेझीम संघाने काळी पँट पिवळा शर्ट अशा विशेष पोषाखात लयबद्ध लेझीम सादर केले. हे पथक केवळ बुलबुल ढोलताशे अशा पारंपारिक वाद्यांच्या आवाजावर ठेका धरत होते.

जय पद्मशाली प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विविध साहसी प्रकार करून दाखविले. यात तलवार, दांडपट्टा, आगीचे बोळे लावलेले दंड आदींचा समावेश होता. जेएमच्या मिरवणुकीत तरुणांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. अग्रभागी चार अश्वांवर मावळ्यांचे पोषाख घातलेले स्वयंसेवक होते. मिरवणूक मार्गावर जाेडबसवण्णा व्यापारी संघटना आणि आरकाल परिवार यांनी पाणी पाऊच वाटप केले. तसेच काही मंडळांनी बेटी बचावचा संदेश चित्ररथाद्वारे दिला.

नाशिक ढोल कारंज्याचा रथ
ओम साई प्रतिष्ठानच्या मिरवणुकीत एलईडी स्क्रीन, लष्करमधील सागर मंडळाचे नाशिक ढोल पथक ट्रेलरवर करण्यात आलेल्या रंगीत कारंज्या वेगळ्या ठरल्या. छोट्याशा मार्कंडेयाच्या मूर्तीसमोर विविध गीतांवर नाचणाऱ्या कारंज्या हा नवा प्रयोग असून यापूर्वी कोणत्याच मिरवणुकीत हा प्रकार दिसला नव्हता.

राजकीय नेते छतावर, रस्त्यावर
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आमदार प्रणिती शिंदे यांनी मिरवणुकीत प्रवेश करीत आनंद लुटला. परवानगी नसल्याने यंदा स्टेज नव्हते. त्यामुळे शिंदे यांनी एका इमारतीच्या छतावरून मिरवणूक पाहिली. तर माजी पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार शिवसेना नेते महेश कोठे फिरून मिरवणूक पाहात होते. गुडेवार यांच्या अंगावर पालिकेचा विशेष पोषाख होता.
बातम्या आणखी आहेत...