पंढरपूर- सोलापूरच्या होटगी रोडवरील होमोअोपॅथिक महिला महाविद्यालयात शिकणाऱ्या पूजा बापूराव पाखरे (वय २५, रा. हरिनयन पार्क, पंढरपूर) या विवाहितेने रविवारी सायंकाळी अापल्या पंढरपूरमधील वडिलांच्या घरी विषारी अौषध पिऊन अात्महत्या केली. याच महाविद्यालयात व्होकेशनल प्रशिक्षण घेणाऱ्या सहकारी तरुणाच्या छळाला कंटाळून तिने हे टाेकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर येत अाहे.
वीरेश ऊर्फ वीरेशकुमार कल्याणराव जलादी (रा. एकतानगर, अशोक चौक, सोलापूर) या तरुणाविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. त्याला चाैकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पाेलिसांनी दिली. पूजा या विवाहित होत्या. त्यांचे सासर व माहेर पंढरपूरच अाहे. त्यांना अडीच-तीन वर्षांचे मूलही अाहे. त्या सोलापुरातील महिला महाविद्यालयात बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत हाेत्या. याच महाविद्यालयात जलादी हा व्होकेशनल काेर्स शिकत हाेता. नेहमी तो पूजाला फोन करून बोलावून घेणे, धमकी देणे, भेटायला बोलाविणे असे प्रकार करीत होता. याला कंटाळून पूजा यांनी रविवारी सायंकाळी घरी विष प्राशन केले.